महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना घडली आहे. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबाच्या बेहिशेबी मालमत्तेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक राजकीय नेत्यांकडे अल्लादिनचा चिराग असतो. कारण अगदी गरीब किंवा मध्यमवर्गीय दिसणारे हे राजकारणी एकाएकी कोणताही उद्योग न करता श्रीमंत होतात. त्यांच्या मिळकतीचे स्रोत काही केल्या कळत नाही. गौरी भिडे यांनी जे धाडस केलेय त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन.
( हेही वाचा : देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक! )
मुळात हा प्रश्न केवळ ठाकरेंच्या मालमत्तेचा नसून बेहिशेबी मालमत्ता जमवणार्या वृत्तीचा आहे. माझा न्यायालयावर विश्वास असल्यामुळे मी उद्धव ठाकरेंना आताच दोषी मानत नाही. ते दोषी आहेत हे न्यायालयात सिद्ध व्हावं लागेल. परंतु कोणताही व्यवसाय न करता त्यांनी पुष्कळ माया जमवली आहे एवढे मात्र खरे. आता या निमित्ताने हळूहळू इतर राजकारण्यांवर देखील असा दबाव निर्माण होऊ शकतो. त्यांच्याही मालमत्तेची चौकशी केली जाऊ शकते. याचसाठी गौरी भिडे यांचं धाडस महत्वाचं ठरतं. कारण त्यांनी सुरुवात केली आहे.
आता फारसं परिचित नसलेलं हे नाव काही दिवसात खूप प्रसिद्ध झालं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनुसार गौरी भिडे यांनी भाजपच्या नेत्यांच्या चौकशीची मागणी देखील केली पाहिजे. खरंतर ठाकरेंच्या समर्थकांचं म्हणणं योग्यच आहे. केवळ उद्धव ठाकरे का? सर्वांवर कायद्याचा धाक बसला पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्ट गौरी भिडे यांनीच करावी असा काही नियम नाही. ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेच्या विरोधात याचिका दाखल करुन त्यांनी एका शुभ कार्याला सुरुवात केली आहे. आता ठाकरे समर्थकांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढील कार्य केलं पाहिजे.
भाजपचे जे कुणी भ्रष्टाचारी नेते असतील, त्यांच्याविरोधात ठाकरे समर्थकांनी याचिका दाखल करुन आपणही केवळ फुकटचे सल्ले देत नाही व कर्म करणार्यांना केवळ दूषणे देत बसत नाही तर न्यायदेवतेवर विश्वास ठेवतो हे दाखवण्याची ही नामी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. आता त्यांना गौरी भिडे महाराष्ट्र द्रोही वाटू लागतील. कारण त्यांच्या मते ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, ठाकरेंवर केलेली टीका ही महाराष्ट्रावर केलेली टीका असते असा गोड गैरसमज त्यांना झालेला असतो. या गोड गैरसमजातून त्यांनी आता बाहेर पडून जगाकडे मोकळ्या मनाने पाहिलं पाहिजे.
आपल्या मनातील न्यूनगंड आता त्यांनी झटकून दिला पाहिजे आणि एक अमानसिक गुलामीतून बाहेर पडलं पाहिजे. असं झाल्यास महाराष्ट्र म्हणजे ठाकरे नाही याचा साक्षात्कार त्यांना होईल आणि सकारात्मक दृष्टी प्राप्त होईल. त्यामुळे अशा समर्थकांनी गौरी भिडे यांना महाराष्ट्र द्रोही ठरवण्यापेक्षा भाजपाच्या नेत्यांविरोधात याचिका दाखल करावी आणि कोर्टात हे सिद्ध करुन दाखवावे की उद्धव ठाकरे यांचे विरोधक भ्रष्टाचारी आहेत.
Join Our WhatsApp Community