पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १९ जानेवारी रोजी मुंबईत आले होते. या वेळी त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. मोदींनी सबका साथ, सबका विकास ते तत्व समोर ठेवत काम केले. राजकारणात चांगल्या कामाला चांगले म्हणण्याची प्रथा असते, जरी आपला विरोधक असला तरी. परंतु काही लोक राजकीय विरोधकांना जानी दुष्मन समजतात, आपला कट्टर शत्रू मानतात. यामुळे राजकीय वातावरण दूषित होते.
आता नरेंद्र मोदी मुंबईत येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बॅनर लावण्यात आले. परंतु मोदींचा द्वेष करणार्यांनी मोदींना विरोध करण्यासाठी बालीश पोस्टरबाजी केली. गिरगावात मोदींच्या पोस्टर्सच्या बाजूला कै. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचा फोटो लावण्यात आला, ज्यात नरेंद्र मोदी बाळासाहेबांसमोर वाकून त्यांचा हात हातात घेऊन नमस्कार करताना दिसत आहेत. हा फोटो लावून ठाकरे गटाच्या कुणा अज्ञात समर्थकाला ’झुकल्या गर्विष्ठ माना’ हा संदेश द्यायचा आहे.
(हेही वाचा ट्विटरचे ब्ल्यू-टिक पाहिजे, तर 11 डॉलर्स मोजा)
मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर का झुकावे?
परंतु त्या निष्पाप बालकाला हे माहित नाही की, बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदींपेक्षा मोठेच होते. ते त्यांना वडिलांच्या जागी होते आणि आपण हिंदू आहोत. कोणताही हिंदू माणूस आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसाला वाकून नमस्कार करतो यात झुकल्या गर्विष्ठ माना हा संदेश कुठून आला? बाळासाहेबांसमोर त्यांच्यापेक्षा लहान असलेले अनेक लोक झुकायचे आणि बाळासाहेबच काय तर अनेक ज्येष्ठ नेत्यांसमोर त्यांच्यापेक्षा लहान नेते नतमस्तक होतातच. यामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. त्या निष्पाप समर्थकाला असे दाखवायचे आहे की मोदी आमच्यासमोर नतमस्तक होतात. परंतु त्याला इतकी साधी बाब कळत नाही की, मोदी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होतात, उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी का नतमस्तक व्हायचे?
मोदींची विश्वनेता होण्याच्या दृष्टीने घौडदौड
नरेंद्र मोदींचा जीवनपट पाहिल्यास लक्षात येते की अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी इतके मोठे यश मिळवले आहे. ते यश, त्यांचे कर्तृत्व एका पोस्टरने झाकले जाणार आहे का? असली पोस्टरबाजी करुन स्वतःचे समाधान होऊ शकते, पण यामुळे नरेंद्र मोदींना किंचितही फरक पडत नाही. उलट आता त्यांची स्पर्धा महाराष्ट्रातील काय तर भारतातील नेत्यांसोबतही नाही. त्यांची स्पर्धा जागतिक स्तरावर आहे. विश्वनेता होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मोदींचा पोस्टर लावून मोदींना कोणताच उणेपणा येत नाही. पण पोस्टरबाजीमध्ये समाधान मानणार्यांना कोण समजावणार?
Join Our WhatsApp Community