भाऊबीजेसाठी भावाकडे आलेली एक बहिण १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग टॅक्सीत विसरुन गेली होती. परंतु पोलिसांनी थोडाही विलंब न करता टॅक्सी चालकाचा शोध घेतला व १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग महिलेला शोधून दिली. त्यामुळे एका बहिणीला मुंबई पोलिसांकडून खरी भाऊबीजेची भेट मिळाल्याचे बोलले जात आहे.
काय झाले नेमके?
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणाऱ्या मेघा अंधेरे यांनी बुधवारी दुपारी भाऊबीज साजरी करण्यासाठी धारावीतील कुंभारवाडा येथे भावाकडे येत होत्या. वाशी येथून त्यांनी ट्रेन पकडली. गुरुतेग बहाद्दूर नगर(जीटीबी) येथे आल्यानंतर त्यांनी तेथून टॅक्सी पकडली व कुंभारवाडा येथे त्या उतरल्या. भावाच्या घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत असणारी सोन्याच्या दागिन्यांची बॅग टॅक्सीतच राहिली. या बॅगेत १५ तोळे (६ लाख रुपये किंमतीचे) सोन्याचे दागिने होते.
(हेही वाचाः जामिनासाठी देशमुखांची आता उच्च न्यायालयात धाव, ‘या’ तारखेला होणार सुनावणी)
मेघा यांनी भावासोबत ज्या ठिकाणी टॅक्सी सोडली त्या ठिकाणी टॅक्सीचा शोध घेतला. मात्र टॅक्सी कुठेच दिसून आली नाही,
६ लाखांचे दागिने गहाळ झाल्यामुळे मेघा या घाबरल्या तर बहीण आपल्याला भेटायला आली आणि तिचे ६ लाखांचे दागिने गेल्याची खंत भावाला वाटू लागली.
पोलिसांचे तातडीचे प्रयत्न
भाऊ आणि बहिणीने तत्काळ शाहू नगर पोलिस ठाणे गाठले व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. भाऊबीजेच्या दिवशी एका बहिणीचे दागिने गहाळ झाले हे कळताच प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरसाठ, पोलिस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी तत्काळ गुन्हा प्रकटीकरण पथकाचे अधिकारी हरीश देशमुख आणि त्यांच्या पथकाला टॅक्सी चालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी असा घेतला शोध
हरीश देशमुख आणि त्यांच्या पथकाने जीटीबी नगर येथे टॅक्सी स्टँड वर जाऊन चौकशी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मेघा ज्या टॅक्सीत बसल्या होत्या त्या टॅक्सीचा शोध पोलिसांनी घेतला. टॅक्सी क्रमांक आणि पाठीमागे असलेल्या हुंदाई कंपनीच्या सिम्बॉलवरून त्यांनी टॅक्सी चालकाची माहिती मिळवली.
(हेही वाचाः शिवशाही बसमध्ये ब्रेकजवळ दगड, विजेच्या खांबावर धडकून झाला मोठा अपघात)
टॅक्सी चालकाचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने बॅग सांभाळून ठेवली असून ती घेऊन पोलिस ठाण्याकडे येत असल्याचे सांगितले. दागिने सापडल्याचे कळताच मेघा आणि तिच्या भावाला आनंद झाला व त्यांनी शाहू नगर पोलिसांचे मनापासून आभार मानले व हीच खरी पोलिस दादांकडून मिळालेली भाऊबीजेची भेट असल्याचे त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community