ठाकरे गट खरोखर ८ ते १० दिवसांत रिकामा होईल?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ठाकरे गटातर्फे सध्या ते जोरदार बॅटिंग करत आहेत. सुषमा अंधारे आता जरा शांत झाल्यासारख्या वाटत आहेत. मुळात संजय राऊत यांची कमतरता भरुन काढण्यासाठी सुषमा अंधारे यांना पक्षात प्रवेश दिला व महत्वाचे पदही दिले अशी राजकारणात चर्चा होती. आता ठाकरे गटाचे तडफदार नेते संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुषमा अंधारे यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यावी हा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे. तसेच त्यांच्यामुळे महिला कार्यकर्त्या नाराज असल्याची चर्चा होत होती.

( हेही वाचा : हिंगोलीत भूकंपाचे धक्के; ३.६ रिश्टर स्केल तीव्रता)

संजय राऊत पुन्हा एकदा एकटे सबंध शिंदे गट आणि नारायण राणेंशी वाद घालत आहेत. शिवसेना आणि भाजपची युती असताना संजय राऊत बर्‍याचदा भाजप विरोधी भाष्य करायचे, युती तुटल्यानंतर संजय राऊतांचा टीका करण्याचा वेग वाढला आणि भाजपावर अतिशय खालच्या पद्धतीची टीका सुरु झाली. त्यावेळी अनेक लोक म्हणत होते की संजय राऊत शिवसेनेला बुडवणार, आजही नारायण राणे आणि इतर नेते संजय राऊतांवर आरोप करत ते पक्ष बुडणार असं म्हणतात. परंतु मी तेव्हाही म्हटलं होतं आणि आताही म्हणतोय की संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या मनातलं बोलत आहेत. उद्धव ठाकरेंना जे हवंय तेच बोलत आहेत.

आता राणे-राऊत वादात संजय शिरसाट यांनी देखील उडी घेतली आहे. “राऊतांच्या बडबडीची माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेत नाहीत याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यावर राऊतांचा दबाव आहे” असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. परंतु याचा दुसरा अर्थ असा आहे की संजय राऊत यांच्या बडबडीवर ठाकरे परिवार काहीच प्रतिक्रिता देत नाही म्हणजे ठाकरेंचा राऊतांच्या बडबडीला मूक पाठिंबा आहे.

शिरसाट असंही म्हणाले की, संजय राऊत यांना शिवसेना वाढावी असे वाटत नाही, ते शिवसेना संपवत आहेत. ठाकरे गट ८ – १० दिवसांत रिकामा होईल. संजय राऊत हे मुळात शिवसेनेचे विरोधक होते. अचानक ते ‘सामना’ मध्ये आले आणि नंतर खासदार झाले. त्यांच्यावर नेहमी आरोप होत असतो की ते शरद पवारांसाठी काम करतात. परंतु हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे देखील मनाने शरद पवारांच्या गटात गेले होते आणि आता तर राष्ट्रवादीची शिवसेना असा शब्दप्रयोग होत आहे आणि यास ठाकरेंना विरोध करावासा वाटत नाही.

उद्धव ठाकरेंवर टीका करता येत नाही म्हणून संजय राऊतांवर टीका होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एका पक्षातील बहुसंख्य आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपला परंपरागत नेता नाकारणे ही साधारण गोष्ट नाही. लोक शिंदेंसोबत गेले यास महत्व नसून त्यांनी ठाकरेंचं नेतृत्व नाकारलं यास जास्त महत्व आहे. याचं कारण संजय राऊतच नव्हे तर पाटणकर कुटुंब देखील आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नको असलेली माणसे बाजूला केली. त्यामुळे ठाकरे गट रिकामा होण्यामध्ये उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे.

आता संजय शिरसाट म्हणत आहेत की ८ – १० दिवसांत ठाकरे गट रिकामा होईल. त्यांनी खरोखर राजकीय भविष्यवाणी केली आहे की आरोपप्रत्यारोप करण्यासाठी साधं विधान केलं आहे हे त्यांचं त्यांनाच माहित. परंतु ठाकरे गट हळूहळू रिकामा नक्कीच होणार आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर कित्येक नगरसेवक बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ठाकरे गटाचा अपमानजनक पराभव झाला तर ठाकरे गट अतिशय सामान्य पक्ष बनून राहिल. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक ठाकरे गटाला जिंकावी लागेल किंवा किमान अपमानजनक पराभव टाळावा लागेल. नाहीतर २०२४ साली ठाकरे गटाचा मुख्यमंत्री बसवण्याचे स्वप्न बघणारे ठाकरे पिता-पुत्र आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांना अत्यंत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागेल. ठाकरे गट उरेल तो फक्त नावासाठी…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here