हात-पाय मोडेपर्यंत मारले तरी पुन्हा ‘आफताब’सोबत गेली आणि…, शरीराचे 35 तुकडे झालेल्या मुलीच्या हत्येची सत्यकथा

प्रेमप्रकरणातून मुलीची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर येत आहे. मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक हिंदू मुलगी आणि आफताब यांच्यात मैत्री झाली, या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. पण घरच्यांच्या विरोधामुळे ते दिल्लीला पळून गेले. त्यानंतर झालेल्या भांडणात आफताबने या मुलीचे 35 तुकडे करत तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे मुंबईत प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मुलीच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय मृत मुलगी आणि आफताब पूनावाला यांची मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. पण मुलीच्या घरच्यांच्या विरोधामुळे हे दोघे जण वसईत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.

पण आफताबकडून मुलीला रोज बेदम मारहाण करण्यात येत होती. या मारहाणीत मुलीचा हात देखील गंभीररित्या फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून ही मुलगी आफताबला सोडून गेली होती. पण काही दिवसांनी आफताब पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आणि आपली चूक झाली असं सांगत त्याने तिला भुलवले. मुलीनेही आफताबवर आंधळा विश्वास ठेवला आणि हे दोघेही दिल्लीच्या छतरपूर परिसरात राहण्यासाठी गेले.

केली निर्घृण हत्या

सहा महिन्यांपूर्वी 18 मे रोजी आफताब आणि मृत मुलगी यांच्यात काही कारणांवरुन कडाक्याचे भांडण झाले. मुलगी यावेळी आरडाओरडा करत असल्यामुळे तिचा आवाज कोणाला जाऊ नये म्हणून आफताबने मुलीचे तोंड दाबले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर आफताबने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.

त्यासाठी त्याने मुलीच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि 18 दिवस हे तुकडे तो मेहरौलीच्या जंगलात फेकत होता. मुख्य म्हणजे तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने एक फ्रीज खरेदी करुन त्यात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे साठवून ठेवले होते.

पोलिसांनी असा केला तपास

दरम्यान, आपल्या मुलीशी अनेक दिवस कोणताही संपर्क न झाल्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिल्लीतील मेहरौली पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा तपास करायला सुरुवात केली. तपास करताना पोलिस आफताब पर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीत ही मुलगी आपल्याला सोडून गेली असून, आपला हिच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची खोटी माहिती आफताबने पोलिसांना दिली. पण मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आफताब विरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा सखोल तपास केला.

त्यानंतर अखेर 6 महिन्यांनी या क्रूर हत्येचा छडा लागला असून, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली येथील जंगलात विविध ठिकाणी फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here