सोयीचे सावरकर आणि सोयीचे हिंदुत्व

स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची संकल्पना व्यापक होती. सावरकरांचा अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होता. ते क्रांतिकारक होते त्याचप्रमाणे ते राजकारणीही होते. राजकीय नेता म्हणून त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या. समाजसुधारक म्हणून त्यांनी केवळ मंचावरुन भाषणे दिली नाहीत तर प्रत्यक्षात जनतेत उतरुन काम केले. जरी त्यांनी बुद्धिनिष्ठ आणि विज्ञानवादाची कास धरली असली आणि काहीवेळा सनातनी प्रवृत्तीच्या लोकांवर टीका केली असली, हिंदू धर्मातील काही चुकीच्या बाबींवर बोट ठेवले असले तरी तुमचे हिंदुत्व वेगळे आणि आमचे हिंदुत्व वेगळे असे सावरकरांनी कुठेही म्हटलेले नाही आणि तशी कृती देखील केलेली नाही.

सुदैवाने आज सावरकर चरित्राचा, साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. माझे काही मित्र आहेत, ते सावरकरांकडे या कारणासाठी ओढले गेले, कारण त्यांना सावरकर नास्तिक वाटतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्यांनाही सावरकरांचे हिंदुत्व मान्य आहे. आता अनेक लोक सावरकरांवर लिहितात, बोलतात ही चांगली गोष्ट आहे, यात वाद नाही. मात्र सावरकरांचा मूळ उद्देश बाजूला राहतो असे वाटू लागले आहे.

मी सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त नागपूर तरुण भारतसाठी ‘सावरकरांचा इतिहास विषयक दृष्टीकोन’ हा लेख लिहिला. काहींनी अभिनंदन करण्यासाठी फोन केला. तर एका वाचकाने मला म्हटले की ‘सावरकरांचा विज्ञानवाद मांडा. फक्त हिंदुत्व काय मांडताय?’ हा वैचारिक गोंधळ सध्या फोफावला आहे. स्वतःला विज्ञानवादी समजणारी मंडळी इतरांचा द्वेष करताना, त्यांची थट्टा करताना आणि त्यांचे हिंदुत्व हे खोटेच आहे असे म्हणताना दिसतात.

मग सावरकरांनी हिंदू संघटनेसाठी काय काय केले याचा विसर यांना कसा पडतो? हे लोक स्वतःला प्रति-सावरकर समजतात की काय असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. आजच्या युगात प्रत्येक हिंदू हा विज्ञानवादीच आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. एखादी व्यक्ती ज्या परिस्थितीत लहानाची मोठी होते, त्या परिस्थितीतील विचार आत्मसात करत ती मोठी होत असते. कधीकधी ती त्या विचारांच्या विरोधात उभी ठाकते तर कधीकधी ते विचार तिच्या जगण्याचा भाग होतात. पण म्हणून आपल्या विचारांची नसलेली व्यक्ती, आपली विरोधक आहे असे बळजबरीने मानून तिचे हिंदुत्व खोटे आहे असे म्हणण्याचा करंटेपणा करावासा वाटणे हेच हिंदुत्वासाठी घातक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी आपल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले की, ‘सावरकरांचे हिंदुत्व बेरीज करणारे होते, त्यांची वजाबाकी करत नव्हते.’ साने सरांचे हे वाक्य मला खूप महत्वाचे वाटते. हिंदुत्ववाद्यांमध्ये जो वैचारिक गोंधळ निर्माण होतोय, त्या दृष्टीकोनातून हे वाक्य अभ्यासले पाहिजे. हिंदुत्व मांडताना, सावरकर लोकांसमोर ठेवताना आपल्याला हिंदुंचे संघटन करायचे आहे, संघटित झालेल्या हिंदुंना वेगळे करायचे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तुमचे हिंदुत्व वेगळे आणि आमचे हिंदुत्व वेगळे किंवा तुमचे हिंदुत्व हे हिंदुत्व नाहीच असला थिल्लरपणा या सो-कॉल्ड अभ्यासकांनी करु नये असे मनापासून वाटते.

एखादी व्यक्ती सनातनी असो, नास्तिक असो, आस्तिक असो किंवा त्या व्यक्तीचे आणखी काही विचार असोत, ती व्यक्ती हिंदू आहे हे सर्वात महत्वाचे आहे आणि त्या व्यक्तीला (जर ती व्यक्ती अनभिज्ञ असेल) राजकीय व सामाजिक परिस्थिती समजावून सांगून त्या व्यक्तीला हिंदुत्वनिष्ठ करणे हे महत्त्वाचे काम असावे. वाद-विवाद या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण यामुळे हिंदुत्वात फूट पडता कामा नये. लक्षात असू द्या, तुमच्या अहंकारापेक्षा हिंदुत्व श्रेष्ठ आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here