वीर सावरकरांच्या देशभक्तीपर कवितांचे वेगळेपण!

265

जयोस्तुते श्रीमहन्मंगले आणि ने मजसी ने परत मातृभूमीला या सावरकरांच्या दोन कविता सर्वपरिचित आहेत. सावरकरांनी अनेक देशभक्तीपर कविता रचल्या आहेत. किंबहुना त्यांच्या इतर विषयातल्या कवितांमध्येही देशभक्ती डोकावते. म्हणूनच सावरकरांनी देशभक्ती नावाचा एक नवा रस निर्माण केला की काय, असे म्हणावेसे वाटते. सावरकरांच्या देशभक्तीपर कवितांबद्दल विचार केल्यास, त्यांच्या कविता वरवरच्या भावनेतून निर्माण झाल्या नाहीत हे लक्षात येते.

( हेही वाचा : गोवर तपासणी प्रयोगशाळांच्या निर्मितीची आरोग्यमंत्र्यांची सूचना, मात्र आरोग्य विभागाकडून केराची टोपली)

सागरास या कवितेत ते सागराला विनवणी करत असले तरी ‘तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक पली तुज प्याला’ असे म्हणत सावरकर सागराला इशारा देखील देतात. मला तर बऱ्याचदा वाटते की सावरकरांना देशभक्तीबद्दलचा आत्मसाक्षात्कार झाला असावा. म्हणजे त्यांच्या मनातील संकल्पना अगदी स्पष्ट होती, कुठेही गोंधळ वाटत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी जे केले, त्याबद्दल त्यांनी लिहिले. त्यांच्या काव्याला आणि एकंदर संबंध लिखाणाला कृतीची जोड होती. म्हणून केवळ कल्पनेचे मनोरे रचण्यात त्यांनी वेळ घालवला नाही. प्रा. भ. श्री. पंडित म्हणतात, ‘त्यांच्या काव्यात निव्वळ कल्पनेचे इमले नाहीत, प्रत्यक्षानुभवाचे रसरशीत अंगार आहेत.’ ‘ऐक भविष्याला भव्य भिषणाला, कोटी कोटी हिंदू जाती सज्ज या क्षणाला’ त्यांच्या काव्यात अशा प्रकारची उत्कटता तर असायचीच, चीड असायचीच परंतु सूड उगवण्याची राष्ट्रीय भावना देखील असायची.

आपल्याकडे दया, क्षमा, शांती – तेथेचि देवाची वस्ती असे सांगण्याची परंपरा आहे. परंतु स्वत:चे आयुष्य आणि राष्ट्रीय जीवन यातला भेद ज्याला करता आला नाही, त्याने संत वचनांचा आणि सुभाषितांचा गोंधळ निर्माण करुन ठेवला. अहिंसा बऱ्याचदा वैयक्तिक जीवनात श्रेष्ठ ठरते, राष्ट्रीय पातळीवर मात्र घातक ठरते. त्यामुळे सावरकरांनी आपल्या भारतीय विरोधकांना जरी शत्रू मानले नाही तरी इंग्रज जोपर्यंत भारतभूमीवर ठाण मांडून आहेत, तोपर्यंत ते आपले शत्रूच आहेत, असा ठाम विचार त्यांनी दिला. कसाबच्या आक्रमणानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणे ही अहिंसात्मक विकृती आहे, मात्र सर्जिकल स्ट्राईक करणे ही सावरकरी प्रवृत्ती आहे.

सावरकरांच्या देशभक्तीपर कवितेत स्वातंत्र्याची भावना आहेच, परंतु दुःख नाही. दोन जन्मठेपेची शिक्षा भोगायला जाताना, ‘तुमचे शासन तरी ५० वर्षे टिकणार आहे का?’ असा प्रतिप्रश्न आत्मविश्वासाने करण्याची सावरकरांची प्रवृत्ती आहे. म्हणूनच सावरकरांच्या कवितेतील देशभक्तीची भावना वरवरची वाटत नाही, तर त्यांना आपल्या इतिहासाचा अभिमान आहे, त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, तो अभिमान बाळगत असताना आपल्या संस्कृतीतील कुप्रथांवर ते आसूड ओढतात, मात्र संस्कृती वा इतिहास नाकारत नाहीत, उलट ते इतिहासातून प्रेरणा
घेतात आणि त्याचबरोबर त्यांच्या कवितांमध्ये कुठेही विलाप आढळून येत नाही, उलट ‘हलाSहलाS त्रिनेत्र तो, मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो.’ असे थेट आव्हान ते देतात. महत्त्वाचे म्हणजे ऐन तारुण्यात त्यांना ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली असताना देखील त्यांनी त्यांच्या कवितेतून रडगाणे गायले नाही, त्यांची कविता कोपऱ्यात बसून ढसाढसा रडली नाही, तर ती लढत राहिली आणि इतरांस देखील लढण्याचे बळ देत राहिली.

हेच वेगळेपण सावरकरांच्या कवितेत जाणवते की, सावरकरांची कविता स्वतः लढते आणि इतरांना लढण्यास उद्युक्त करते. त्यांच्या कवितेतील उत्कट भाव, रसाळता, शत्रूला आव्हान देण्याची वृत्ती आणि इतरांना पराक्रम गाजवण्यास प्रवृत्त करण्याची पद्धत या सर्व अंगांनी विचार केल्यास सावरकरांच्या देशभक्तीपर कविता अतिशय वेगळ्या नि सर्वकाळ श्रेष्ठ ठरतात. महत्त्वाचे म्हणजे स्वतः अग्निकुंडात झेप घेऊन त्यांनी इतरांना तसे करण्यास प्रवृत्त केले आहे. सावरकरांच्या कवितांचे संदर्भ जुने असले तरी आजही त्यांच्या कविता लढण्यास बळ देतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.