उद्धव ठाकरे हे अतिशय संभ्रमित झालेले नेते आहेत. ते सध्या वाट मिळेल त्या दिशेने जात आहेत. आधी संभाजी ब्रिगेडसोबत युती करण्याची घाई केली. या युतीचं पुढे काय होईल त्यांचं त्यांनाच ठाऊक. आता वंचितशी युती केली आहे. ही युती मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. यावर त्यांचं म्हणणं असं आहे की, दोन्ही वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. या दोघांचेही आजोबा महान होता यात कोणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही. परंतु आजोबांच्या कर्तृत्वाचा मान नातवांना मिळणे अशक्य. कारण दोघेही लोकोत्तर पुरुष होते आणि लोकोत्तर महात्म्ये हे कधीच एका कुटुंबापुरते मर्यादित नसतात. याचा विचार या दोघांनाही पडलेला दिसतो. या दोघांनी आपल्या आजोबांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी, त्यांचा प्रचार – प्रसार करण्यासाठी काय काय केले आहे याविषयी ते माहिती देऊ शकणार नाहीत.
हिंदुत्वाच्या आडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे तर बाळासाहेबांच्या मूळ विचारांपासून दूर जात आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचे साधे वाचन देखील त्यांनी केले नसावेत. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरच टीका केली. हिंदुत्वाच्या आडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. बीजिंगमध्ये सरकारच्या विरोधात कुणी बोललं तर दोन दिवसांत तो माणूस गायब होत असे म्हणत ठाकरेंनी भारतात सुद्धा अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.
(हेही वाचा भारतात भूकंपाचे हादरे का बसतात; महाराष्ट्रात कोणता भूभाग आहे भूकंपप्रवण?)
इतरांवर हुकुमशाहीचा आरोप करतात
ठाकरेंनी आपल्या महाविकास आघाडीच्या काळात काय काय घडलं याचा विचार करायला हरकत नाही. भाजप सरकारच्या विरोधात कुणी बोलला तर गायब होण्याचं एक उदाहरण ठाकरेंनी दाखवावं. उलटपक्षी महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या विरोधात कुणी बोललं तर गुंडांकरवी हल्ले केले जायचे, सर्वसामान्य माणसांना त्रास दिला जायचा, नेत्यांवर जीवघेणे हल्ले व्हायचे, लोकांना विनाकारण तुरुंगात पाठवलं जायचं, सुशांत सिंह राजपूत, मनसुख हिरेन अशा काही लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला. आघाडी सरकारच्या पापाचे पाढे म्हणायला गेलो तर जन्म पुरायचा नाही. आणि हे लोक इतरांवर हुकुमशाहीचा आरोप करतात.
हिंदुत्वात सगळे सुरक्षित आहेत
हिंदुत्वात कोणत्याही प्रकारची हुकुमशाही नसून हिंदुत्व म्हणजे लोकशाही. हिंदुत्वात सगळे सुरक्षित आहेत आणि म्हणूनच भारतात हिंदू भावविश्व असल्यामुळे सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे दोन्ही नातू आपल्या आजोबांच्या विचारांपासून खूप दूर गेले आहेत. हे दोघे आता एकत्र आले आहेत, ते हिंदुंत्वाच्या विरोधात. पण हिंदुत्वाला याने काहीही फरक पडणार नाही. उलट हिंदुत्वाचा जयजयकार आता जगभरात होणार आहे.
Join Our WhatsApp Community