रविवार, ५ मार्च रोजी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शाळेत झालेल्या अनेकविध उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाडमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्मारामजी सासे, शाळेचे माजी पालक प्रा. अरुण कपाले व मुंबई महानगरपालिकेत जल विभागात कार्यरत असलेले उप अभियंता शाळेचे माजी विद्यार्थी जनार्धन ठाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी शाळेत वर्षभरात घेतलेल्या शैक्षणिक तसेच क्रिडाविषयक उपक्रमांची माहिती सादर केली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवीत करण्यासंदर्भात महत्व स्पष्ट केले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळेत झालेल्या अनेक स्पर्धा, परीक्षा आणि क्रिडा स्पर्धामधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
(हेही वाचा पाच हक्कभंग प्रस्ताव आले; पण निर्णय घेण्यासाठी विधानपरिषदेत हक्कभंग समितीच नाही!)
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. अरुण कपाले सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जे पारितोषिक मिळाले त्यावर समाधानी न रहाता पुढील काळात मोठी ध्येये समोर ठेवून ती प्राप्त करण्यासाठी सतत धडपड करावी आणि ती साध्य करावीत. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले दिलीप आरोटे सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त अंगी बाणवावी आणि पुढील काळात भावी जीवनात आपल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा. या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित पाहूणे, शाळेचे माजी विद्यार्थी ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली तर त्यांना आपली ध्येये गाठता येतील. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालक आणि गुरुजणांचा आदर केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले सर यांनी केले. कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाची ‘राज्यगीता’ ने सांगता झाली.
Join Our WhatsApp Community