पश्चिम बंगालच्या दार्जिंलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणिसंग्रहालय हे देशातील सर्वोत्तम प्राणिसंग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
लाल पांडा हे दार्जिलिंग प्राणिसंग्रहालयाचे मुख्य वैशिष्ट्य असून येथे हिमालयन काळे अस्वल, हिम बिबळ्या, गोरल आणि हिमालयन थर हे प्राणीही या संग्रहालयात आहेत.
केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या प्राधिकरणाने व्यवस्थापन आणि सुविधा यासारख्या विविध निकषांवर देशभरातील प्राणिसंग्रहालयाचे मूल्यमापन केले. दार्जिलिंगच्या प्राणिसंग्रहालयाला ८३ टक्के गुण मिळाल्याचे संचालकांनी सांगितले. देशात एकूण १४७ मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालये आहेत. यात मोठ्या, मध्यम आणि लहान स्वरूपाच्या प्राणिसंग्रहालयाचा समावेश आहे.
दार्जिंलिग झुओलॉजिकल पार्कची स्थापना १४ ऑगस्ट १९५८ मध्ये झाली. हिमालयात दुर्मीळ असलेल्या हिमबिबट्या आणि लाल पांडा या प्रजातींचे प्रजनन आणि संवर्धनासाठी दार्जिलिंगचे प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते.
या यशाचे श्रेय प्राणिसंग्रहालयातील सर्व कामगारांना जात असल्याची प्रतिक्रिया दार्जिलिंग प्राणिसंग्रहालयाचे संचालक बसवराज होल्याची यांनी दिली.
Join Our WhatsApp Community