सिनेमांतील ‘डायलॉगवरुन’ मुंबई पोलिस म्हणाले “Mind Your Language”

तरुणाईला जास्तीत-जास्त आकर्षित करण्यासाठी सिनेमांमध्ये कायमंच प्रेमकथा मांडल्या जातात. तरुणींना इंम्प्रेस करण्यासाठीचे विविध फंडे सुद्धा अनेक सिनेमांमध्ये सांगितले जातात. दोघांमधील जवळीक वाढवणारे काही प्रेमळ सीन आणि शिट्ट्यांचे डायलॉग सर्रासपणे सिनेमांमध्ये वापरले जातात. पण याचा समाजाच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो हे मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. मुबंई पोलिसांनी त्यासाठी Mind Your Language यांसरख्या काही हॅशटॅग्सचाही वापर केला आहे.

सोशल मीडियावर मुंबई पोलिसांकडून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, सिनेमा आणि समाजाला जागरुक करण्याचा त्यातून प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर आणि इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जुन्या-नव्या सिनेमांतील डायलॉगचा संदर्भ देत सिनेमांमध्ये शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

सिनेमा हे आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. इथे अनेक सिनेमांमधील असंख्य डायलॉगपैकी फक्त काही आम्ही दाखवत आहोत. ज्यावर समाज आणि सिनेमा आणि दोघांनीही विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत कायदा हस्तक्षेप करू इच्छित नाही तोपर्यंत आपले शब्द आणि कृती काळजीपूर्वक असू द्या, असा इशाराही मुंबई पोलिसांकडून ट्विटरद्वारे देण्यात आला आहे.

आपण वापरलेला प्रत्येक शब्द हा आधी एक विचार असतो. दैनंदिन जीवनात, तसेच चित्रपटात वापरली जाणारी भाषा आपल्या विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरा, असा सल्ला मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावरुन पोलिस प्रशासन, सरकार यांना वेठीस धरले जात आहे. पण आपल्या कृतीमुळे तर समाज बिघडत नाही ना, असे सांगत मुंबई पोलिसांनी या माध्यमातून अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या समाज माध्यमांचा वाढता वापर हा समाजविघातक गोष्टींसाठीच जास्त होताना दिसतो. पण मुंबई पोलिसांकडून मात्र या माध्यमांचा समाजप्रबोधनासाठी वापर केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here