एरव्ही नवदाम्पत्य विवाहानंतर हनीमून आणि आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असतात. पण सध्या दहिसरमधील कारकर नवदाम्पत्य हे याला अपवाद ठरलंय. संसाराकडे लक्ष वेधताना कारकर कुटुंबातील या नववधूने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावत, समाजकारणातही आपले तेवढेच योगदान देण्यास सुरुवात केली आहे आणि तेही कोरोना काळात. विभागातील जनसेवा करताना पतीला मदत करता यावी, म्हणून विवाह पार पडल्यानंतर आता त्या त्यांच्यासोबतच विभागातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी आणि त्याबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांचे नाव आहे दिक्षा संखे-कारकर. दहिसरमधील शिवसेना नगसेवक हर्षद प्रकाश कारकर यांच्यासोबत त्या २२ एप्रिल रोजी विवाहबध्द झाल्या आणि हर्षद यांच्या जोडीने दिक्षा विभागात फिरुन समस्या जाणून घेत आहेत.
वडिलांप्रमाणेच हर्षद यांचे समाजकार्य
दहिसरमधील शिवसेना नगरसेवक आणि विधी व महसूल समितीचे अध्यक्ष हर्षद प्रकाश कारकर हे २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले. यापूर्वी दहिसरमधील प्रभागातून हर्षद यांचे वडील प्रकाश कारकर हे निवडून येत. पण २०१७च्या निवडणुकीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत. पण विभागातील कार्यसम्राट नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. विनोद घोसाळकर यांच्या खांद्यावरील विभागप्रमुख पदाची जबाबदारी काढून, जेव्हा दुसऱ्यावर सोपवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला, तेव्हा माजी नगरसेवक असलेल्या प्रकाश कारकर यांच्यावरच शिवसेनेने विश्वास दाखवला. पण प्रकृतीमुळे त्यांना विभाग प्रमुखपद सांभाळण्यात अडचणी येऊ लागल्याने, पक्षाने विलास पोतनीस यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. पण वडिलांप्रमाणेच विभागातील प्रत्येक समस्यांकडे हर्षद कारकर यांचे बारीक लक्ष असते. हर्षद हे युवा सेनेचे पदाधिकारी असल्याने २०१७च्या निवडणुकीत समोर भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार असतानाही, प्रकाश कारकर यांनी आपल्या मुलाला निवडून आणण्याची किमया साधली.
हर्षद आणि दिक्षा यांच्या ‘लग्नाची गोष्ट’
हर्षद कारकर यांना मागील वर्षात विधी व महसूल समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर विविध समित्यांच्या अध्यक्षपदावरुन अनेकांना हटवले, पण कारकर यांना पुन्हा समिती अध्यक्ष बनवले. २२ एप्रिल २०२१ रोजी ते शिवसेनेच्या युवा सेनेच्या पालघर जिल्हा युवती अधिकारी असलेल्या दिक्षा संखे यांच्याशी विवाहबध्द झाले. दिक्षा संखेंना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. दिक्षाचे वडील हे शिवसेनेचे बोयसर येथील शाखाप्रमुख आहेत, तर आई बोयसर कुंभवली या गावची माजी सरपंच आहे. त्यामुळे दोन्ही घराणी ही राजकारणाशी संबंधित असल्याने त्यांचा गोतावळाही मोठाच आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत, अवघ्या २५ जणांच्या उपस्थितीतच दोन्ही युवा सेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी लग्नसोहळा उरकून घेतला. युवा सेनेच्या एका कार्यक्रमात या दोघांची ओळख झाली आणि आता हे दोघेही विवाहबंधनात अडकून एकमेकांचे आयुष्यभराचे जीवनसाथी बनले आहेत.
पती-पत्नी समाजकारणात सक्रीय
लग्नाला अवघे बारा-तेरा दिवस झाले असले, तरी लग्नाच्या नवलाईत अडकून न पडता विभागात हे नवदाम्पत्य फिरताना, लोकांचे प्रश्न जाणून घेताना, तसेच नागरी सुविधा प्रश्न सोडवण्यासाठी ऑन फिल्ड उतरलेले पहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी हर्षद आणि दिक्षाने दहिसर मिठी नदीमधील सफाईची पाहणी केली. तसेच रतन नगर परिसरात छोट्या नाल्यांच्या सफाईची पाहणीही केली.
त्यानंतर त्यांनी ओवरीपाडा वृंदावन रोडवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू होती, त्याचीही पाहणी केली. त्यानंतर प्रेमजीनगर येथील जनतेशी या दाम्पत्याने संवाद साधला. मुळात घरात राजकीय वारसा असला तरी लग्नानंतर तेवढ्याच आत्मियतेने राजकारण करण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींची संख्या फारच कमी असते. पण दिक्षा संख्येने, सासरे प्रकाश कारकर यांना अभिप्रेत असाच समाजकारणात रस दाखवायला सुरुवात केली आहे. जे आता हर्षदसाठीही मोठा आधार ठरताना दिसत आहे. यापूर्वी बाबांचे मार्गदर्शन मिळायचे आता दिक्षालाही त्यात रस असल्याने, विभागातील समस्या सोडवण्यात मोठा हातभार लागेल असे हर्षद कारकर सांगतात.