मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी आणि इच्छुक उमेदवारांनी लोकांच्या घराघरांत पोहोचण्याचा मार्ग निवडला आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी नागरिकांना गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून गणेश पूजन साहित्याचे वाटप, तर भाजपच्या नगरसेवकांकडून उकडीच्या मोदकांचे साहित्य वाटप करत जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या हस्ते वाटप
श्री. गणरायाचे आगमन शुक्रवारी होत असून, या उत्सवासाठी भाविकांना शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने गणेश पूजन साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या गणेश पूजन साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ केल्यानंतरत शिवसेना नगरसेवक अमेय घोले, सुजाता पाटेकर, गीता सिंघण, बाळकृष्ण ब्रीद, रिद्धी खुरसुंगे, यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विभागातील जनतेला गणेश पूजन साहित्याचे वाटप केले आहे.
भाजपकडून उकडीच्या मोदकांचे साहित्य
शिवसेनेने गणेश पूजन साहित्याचे वाटप केल्यानंतर भाजपनेही भाविकांना उकडीच्या मोदकाचे साहित्य वाटण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या माटुंगा- शीव येथील नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी विभागातील जनतेला उकडीच्या मोदक साहित्याचे वाटप केले आहे. या उकडीच्या मोदक साहित्यात नारळ, तांदळाचे पीठ, गूळ, वेलची व इतर वस्तू आदींच्या किटचे वाटप केले आहे.
नागरिकांना मदत करण्यासाठी
मागील गणेशोत्सवामध्ये कोविडच्या काळात अनेक नगरसेवकांनी मोफत गणेश मूर्ती उपलब्ध करुन दिल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंबांना उत्सव साजरा करताना गणेश मूर्तींसाठी किमान २ ते ४ हजार रुपयांची मूर्ती खरेदी करणे अवघड होते. त्या परिस्थितीत लोकांना तो एक आधार ठरला होता. त्यामुळे यंदाही काही नगरसेवक व इच्छुक राजकीय पक्षांचे नगरसेवक यांनी गणेश मूर्ती उपलब्ध करुन दिल्या होत्या.
Join Our WhatsApp Communityमागील वर्षी पक्षाच्या काही ठराविक नगरसेवकांनी गणेश पूजन साहित्याचे वाटप केले. पण यावर्षी पक्षाच्या बहुतांशी नगरसेवकांनी साहित्याचे वाटप केले आहे. मी स्वतः जुलै पासून लोकांची यादी करुन गणेश पूजन साहित्याच्या वाटपाला सुरुवात केली आहे. आजवर ५०० ते ६०० कुटुंबांना या साहित्याचे वाटप केले आहे. यामध्ये हळद-कुंकू सह गूळ, सुके खोबरे वाटी या नैवेद्यापर्यंत २७ वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये जे कुटुंब गावी गणपतीला जात आहे किंवा ज्यांच्या घरी मुंबईत गणपतीची मूर्ती आणला जाते, त्यांना या गणेश पूजन साहित्याचा बॉक्स दिला जातो.
-अमेय घोले, नगरसेवक, शिवसेना वडाळा