कोरोना ही भारत मातेच्या सुपुत्रांकरिता परीक्षेची घडी होती. संपूर्ण देश संकटात असताना काही उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगार कपात तसेच वेतन कपात न करता दुपटीने काम केले. कोरोनासारखी संकटे देशावर अधूनमधून येत असतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. कोरोना काळात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या राज्यातील ५१ उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी, २३ ऑगस्ट रोजी राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई तरुण भारत तर्फे आयोजित या ‘कोविड योद्धा उद्योजक सन्मान’ सोहळ्याला मुंबई तरुण भारतचे मुख्य संपादक किरण शेलार व व्यापार पणन प्रमुख रविराज बावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना काळात देशात स्वच्छता सेवक, वॉर्डबॉय, डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, अशासकीय संस्था, शासकीय अधिकारी, उद्योजक आदी सर्वांनी स्वयंप्रेरणेने काम केले. अंतःकरणापासून केलेल्या चांगल्या कामामुळे आत्मिक समाधान लाभते व त्याहीपेक्षा जनसामान्यांचे आशीर्वाद मिळतात असे सांगून कोरोना संपला असे न समजता प्रत्येकाने भविष्यातही सावधगिरी बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी आपल्या भाषणातून केली. राज्यपालांच्या हस्ते बिपीन शाह, डॉ कविता खडके, कुशल देसाई, वैशाली बोथरा, महेश खेडकर, प्रबोध ठक्कर, एस. गणपती, मिलिंद संपगावकर, प्रवीण पोहेकर, संजय दुबे, सचिन शिंदे, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानित उद्योजकांची गौरवगाथा असलेल्या ग्रंथाचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
(हेही वाचा : आता एकाही बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्यास आरोग्य सचिव जबाबदार!)
Join Our WhatsApp Community