केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेणार असल्याचे कळते.
( हेही वाचा : Whatsapp Feature : झुकरबर्गने फेसबुकवरून सांगितले व्हॉट्सअॅपचे फिचर! काय आहे ते जाणून घ्या)
बुधवारी (२६ एप्रिल) रात्री १० वाजता अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर ते हॉटेल ‘रॅडिसन ब्लू’च्या दिशेने मुक्कामासाठी रवाना होतील. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेही याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत. अमित शहा बुधवारी रात्री राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या गुप्त बैठकीच्या नियोजनासाठी स्वतः एकनाथ शिंदे ७.३० वाजता नागपुरात दाखल होणार आहेत.
शिंदेंच्या मनातील संभ्रम दूर करणार
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे. हा निकाल विरोधात गेल्यास राज्यातील सरकार कायम राहावे, यासाठी भाजपा प्लॅन ‘बी’ आखत आहे. त्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दुसरीकडे काँग्रेसमधील एका गटाशीही भाजपाने जवळीक वाढवली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी थेट अमित शहा यांना कळवली आहे. परिणामी शिंदेंच्या मनातील संभ्रम दूर करण्यासह भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे कळते.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community