आषाढी एकादशीनिमित्त मोदी-शहांकडून मराठीत शुभेच्छा! निवडणुकांचे वारे की आणि काही…?

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपलाही मराठी भाषिकांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्या प्रयत्नांना मोदी-शहा यांच्या मराठी भाषेतील एकादशीच्या शुभेच्छा 'बुस्टर' होता का, अशीही चर्चा आता राजकारणात रंगू लागली आहे.

188

महाराष्ट्रातील राजकारण कायम दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेत असते, मग या ठिकाणी जिल्ह्या परिषद निवडणुका असोत कि महापालिकेच्या निवडणुका! दिल्लीत कुणाचेही सरकार येवोत, त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडे कायम असते. यंदा आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध अवघ्या महाराष्ट्राला लागले आहे. त्याकरता सर्व पक्ष कामाला लागले आहेत, अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चक्क मराठी भाषेत महाराष्ट्रातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन मराठी भाषिकांचे लक्ष वेधून घेण्याचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेला ‘चळवळ’ संबोधित करून वारकरी बांधवांचे सामाजिक पातळीवरील महत्व ठसठशीत अधोरेखित केले आहे. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.’ असा शब्दात मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यात वारकरी संप्रदाय सर्वात मोठा संप्रदाय आहे. राजकीयदृष्ट्या या समाजाचे महत्व याआधीही अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील खेडोपाड्यापासून ते मुंबईसारख्या शहरांमध्येही हा संप्रदाय पसरलेला आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून एकादशी निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला शुभेच्छा देताना वारकरी बांधवांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे.

(हेही वाचा : मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही! बकरी ईदसाठी सवलत मागणाऱ्यांना न्यायालयाने सुनावले!)

अमित शहांनी म्हटला अभंग!

गृहमंत्री अमित शहा यांनीही चक्क अस्खलित मराठी भाषेत अभंगाच्या ओवींसह एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीवभाव॥ टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलभक्तांची पायी वारी व संत संप्रदायाच्या शिकवणीचा महान वारसा असलेली वारकरी परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल… ज्ञानदेव तुकाराम’, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न!

‘वारी’ हा केवळ वारकरी बांधवांसाठीच नव्हे, तर अवघ्या मराठी भाषिकांसाठी भावनिक विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन मराठी मनाला साद घातली का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळणार आहे. काँग्रेसनेही मुंबई अध्यक्षपदी मराठी चेहरा आणून त्याची सुरुवात केली आहे. तर मनसेचा आधीपासून मराठी विषय प्राधान्याचा आहे, अशा वेळी भाजपलाही मराठी भाषिकांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्या प्रयत्नांना मोदी-शहा यांच्या मराठी भाषेतील एकादशीच्या शुभेच्छा ‘बुस्टर’ होता का, अशीही चर्चा आता राजकारणात रंगू लागली आहे.

(हेही वाचा : देशात कुणीही सुरक्षित नाही! फोन टॅपिंगवरून संजय राऊतांचा टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.