रायगड जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १ हजार ७० नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४५९ योजनांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, ३९७ योजना प्रगती पथावर आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
( हेही वाचा : कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री)
रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सन २०२२ मध्ये उन्हाळ्यात पाणी पुरवठा मुबलक होण्यासाठी ३७ टँकरद्वारे ५८ गावे आणि २४५ वाड्यांत पाणी पुरवठा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील या योजना गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, समीर कुणावार, जयकुमार रावळ यांनी सहभाग घेतला.
पाणी पुरवठा कामातील गैरव्यवहाराची चौकशी
- बीड जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
- बीड जिल्ह्यातील गैरप्रकाराप्रमाणे राज्यातील इतर काही ठिकाणी अशा प्रकारे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
- याबाबतच्या चर्चेत सदस्य धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.