येत्या काही दिवसांत ठाकरे सरकारमधील किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. यातच पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे ते १० मंत्री कोण आहेत? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मंत्र्यांना नियम लागू होत नाही का?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनमुळे यांना अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे. बावनकुळे यांच्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामे झाली, त्यांची चौकशी करावी. तुमचे सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल. आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या. २० दिवस झाले, मंत्रिमंडळातील १ मंत्री कारागृहात असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा का घेत नाही ? सरकारी नोकराला अटक झाली की, २४ तासांत निलंबित करावे लागते, असा नियम आहे, मात्र तुम्ही त्याही नियमाचे उल्लंघन केले, असे पाटील म्हणाले.
(हेही वाचा फडणवीस, दरेकरांनंतर आता बावनकुळेंची ‘या’ प्रकरणी होणार चौकशी)
मंत्र्यांचा भोंगळ कारभार उघड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा.’ त्यामुळे काही सुपात आहेत आणि काही जात्यात आहेत. सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे पीठ होणार हे नक्की. इतकेच नाही, तर सरकारमधील मंत्र्यांचा भोंगळ कारभार उघड होत आहे. सध्या एकाच वेळी अनेक कारवाया चालू आहेत. एका मंत्र्याने १ हजार ५०० कोटी रुपयांची कामे स्वतःच्या जावयाला दिली. न्यायालयाने फाटकारल्यानंतर ती कामे रहित करावी लागली. अनिल परब यांच्या रत्नागिरी येथील रेसॉर्टप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्यानेच तक्रार दाखल केली आहेत. त्यामुळे किमान १० जणांना तरी नैतिकता असेल किंवा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागेल, असेही पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community