शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत सत्ताबदल घडवून आणल्यानंतर, आता उद्धवसेनेतील तब्बल १० खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात खासदार कृपाल तुमाणे यांच्या घरी शुक्रवारी रात्री १० खासदारांची भोजनबैठक झाली. त्यात शिंदेपुत्रही उपस्थित असल्याने चर्चांना वेग आला आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आधीच एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यानंतर त्यांची प्रतोद पदावरून हकालपट्टी झाली असली, तरी पक्षाच्या या कृतीबाबत काही खासदारांत नाराजी आहे. दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्ष प्रमुखांना पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना नेते तुमाणे यांच्या घरी झालेल्या भोजन बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे या बैठकीला उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण भाजपशी पुन्हा युती करण्यास अनुकूल असलेल्या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
( हेही वाचा: शिवसेनेने आता ‘या’ दोन नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी )
दरम्यान, शिवसेना आमदारांच्या बंडखोरीला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींनी बळ दिले होते. आता खासदारांच्या फुटीला राष्ट्रपती निवडणूक निमित्त ठरणार असल्याच्या चर्चा आहेत.
Join Our WhatsApp Community