शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी 10 हजार बसेस भरुन समर्थक येणार मुंबईत, सर्व सभांचे रेकॉर्ड मोडण्याची तयारी

शिंदे गट आणि ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा नेमका कुठे होणार याबाबत अजून निर्णय झालेला नसताना दोन्ही गटांनी मात्र मेळाव्यासाठी शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. दसरा मेळाव्यासाठी 5 लाख लोकांपेक्षा जास्त गर्दी जमवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले असून त्यासाठी राज्यभरातील पदाधिका-यांवर जबाबदारी देखील सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कार्यकर्ते गोळा करण्यासाठी टार्गेट

शिंदे गटाला समर्थन देण्यासाठी राज्यभरातून 10 हजार बसेस मुंबईत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मुंबईत येणा-या समर्थकांसाठी एक विशेष ट्रेनदेखील बूक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे सर्व 40 आमदार आपापल्या मतदारसंघातून कार्यकर्ते गोळा करणार आहेत याशिवाय सर्व जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख आणि पदाधिका-यांना देखील कार्यकर्ते गोळा करण्यासाठी टार्गेट देण्यात आले आहे.

(हेही वाचाः शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली, उच्च न्यायालयात या दिवशी होणार निर्णय)

कार्यकर्त्यांसाठी ट्रेन बूक

जळगाव जिल्ह्यातील समर्थकांसाठी जवळपास तीन ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ दोन लाख रुपये रक्कम प्रत्येक ट्रेनसाठी देण्यात आल्याचे कळत आहे. इतकंच नाही तर या सर्व कार्यकर्त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय देखील मुंबईत करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील मोठमोठी हॉटेल्स आणि हॉल यासाठी बूक करण्यात आले आहेत. यासाठीची जबाबदारी सुद्धा काही खास लोकांवर सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शक्तीप्रदर्शन कशासाठी?

या सभेतून आजवरच्या सर्व सभांचे रेकॉर्ड मोडण्याचा निर्धार शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या सभेतून महत्वाचा संदेश देण्याचा शिंदे गटाचा मानस आहे. शक्तीप्रदर्शन झाल्यामुळे त्याचा फायदा हाऊन शिंदे गटात येणा-या कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढेल आणि पर्यायाने शिंदे गटाची राजकीय ताकद देखील वाढेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here