‘शिकलास नाहीतर रस्त्यावर झाडू मारावी लागेल. . .’, ‘रस्त्यावर झाडू मारायची नसेल, तर शिक आणि मोठा हो’, असे लहानपणापासून आपल्या मनावर आई-वडिलांकडून बिंबवले गेले आहे. परंतु आज उच्च शिक्षण घेऊनही अनेकांना रस्त्यांवर झाडू मारण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तब्बल एक हजारांहून अधिक सफाई कामगार हे पदवीधर असूनही रस्त्यांवर झाडू मारत आहेत. मात्र, या शिकलेल्या कामगारांना कमी शिकलेल्या कामगारांसोबतच झाडू मारण्याचे काम करावे लागत असून ‘शिकून काय मोठे तारे तोडलेल, काम करत आमच्यासारखेच करतात ना. . . रस्त्यावर झाडूच मारावी लागली ना. . .!’, असे आता या शिकलेल्या कामगारांना कमी शिकलेल्या सह कामगारांकडून ऐकावे लागत आहे. त्यामुळे या शिकलेल्या कामगारांच्या शिक्षणाचा आदर महापालिका करणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणी अनुकंपा तत्वावर, तर कुणी चतुर्थ श्रेणी
मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यामध्ये सुमारे २८ हजार कामगार कार्यरत आहेत, त्यातील सुमारे एक हजार कामगार उच्चशिक्षित आहेत. परंतु कोणी अनुकंपा तत्वावर, तर कोणी चतुर्थ श्रेणीमध्ये कामाला लागले. परंतु उच्च शिक्षित असूनही त्यांना रस्त्यावर दररोज झाडू मारावा लागत आहे. कुटुंबात आणि समाजामध्ये आपण उच्च शिक्षित असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात झाडूच मारत असल्याने त्यांना बऱ्याच वेळा मान झुकून चालावे लागत आहे. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षणाला साजेशी नोकरी नसल्याने आणि सरकारी नोकरी असल्याने महापालिकेच्या सफाई खात्यातून आज ना उद्या वरच्या पदावर पोहोचता येईल, या आशेने त्यांनी नोकरी पत्करली. परंतु या शिकलेल्या कामगारांच्या शिक्षणाची दखलच महापालिका प्रशासनाच्यावतीने घेतली जात नाही.
या उच्च शिक्षित सफाई कामगारांची पदोन्नती देण्याची मागणी आहे. परंतु याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. याबाबतची पडताळणी करून मार्गदर्शक धोरण बनवण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
– डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)
विविध संवर्गातील सुमारे १३०० पदे रिक्त
या उच्च शिक्षित सफाई कामगारांमध्ये बीए, बीकॉमसह बीएस्सी तसेच इंजिनिअरींगची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत. यांना या सेवेत पाच ते दहा वर्षांपासून अधिक काळ लोटला आहे. एका बाजुला प्रशासन यातील काही कामगारांची मदत घेऊन प्रशासकीय कामे करून घेत गरज भागवून घेत आहेत. परंतु त्यांना वरच्या पदावर सामावून घेत नाही. चतुर्थ श्रेणीतील या कामगारांना ‘क’ श्रेणीत पदोन्नती देण्याचे दरवाजे खुले आहे. परंतु प्रशासकीय धोरणामुळे या शिकलेल्या कामगारांना त्यांच्या शिक्षणानुसार वरच्या पदावर बढती दिली जात नाही. आज ‘क’ संवर्गातील कनिष्ट लेखापरिक्षक, लेखा सहायक, कनिष्ट अवेक्षक, कार्यकारी सहायक पदावर सामावून घेता येऊ शकते. अशा प्रकारची विविध संवर्गातील सुमारे १३०० पदे रिक्त आहेत. वारंवार प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही या कामगारांच्या हाती निराशाच लागत आहे. महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्या शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री हे शिक्षणाच्या मुद्द्यावर कायमच आग्रही असतात. परंतु त्यांची सत्ता असलेल्या महापालिकेतच या उच्च शिक्षित मुले ही रस्त्यावर झाडू मारत असून या उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार सेवेत पदोन्नती देण्यासाठी त्यांना यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेसे वाटत नाही.
Join Our WhatsApp Community