राज्यातील कोरोना लाटेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाल्याने आता स्थानिक प्रशासनाच्या निवडणुकांच्या लाटेला उधाण आलं आहे. त्यामुळे सगळेच पक्ष या निवडणुकांसाठी जोमाने तयारी करत आहेत. आधीच भाजपातून अनेक नेत्यांचे शिवसेना, राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले असून, भाजपातील हे आऊटगोईंग पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसत आहे.
आता जळगावात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगावातील भाजपाच्या तब्बल 11 नगरसेवकांनी कमळाची साथ सोडत शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपाला मोठे खिंडार पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(हेही वाचाः सामंतांनी कोकणात शिवसैनिकाला रसातळाला नेले- राणे)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधले शिवबंधन
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील 11 भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
खडसेंचा जळगावात प्रभाव कमी?
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हाती घड्याळ बांधल्यानंतर राष्ट्रवादीत त्यांच्या समर्थकांची भरती जोरात सुरू होणार अशी चर्चा होती. पण जळगावातील या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच खडसेंची जळगावातील ताकद कमी झाल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
(हेही वाचाः सामनाची ‘रोखठोक’ भाषा ‘नरमली’? राज्यपालांचे मानले आभार)
Join Our WhatsApp Community