महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मागील आठवड्यात तीन महिने संप सुरु होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हा संप सुरु होता. मात्र त्यावेळी ठाकरे सरकारने ही मागणी मान्य केली नाही, त्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कारणीभूत आहेत, असा आरोप करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानातून थेट सिल्व्हर ओक येथील शरद पवारांचे निवासस्थान गाठले. तिथे कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी, ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एसटीने सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.
संतप्त एसटी कामगारांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक केली होती. त्यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या १०९ एसटी कामगारांना अटक केली होती, त्यांच्यावर पोलिसांनी सविस्तर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल केले. त्याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पुढे एक महिन्याच्या कालावधीत त्यांना जामीन मिळाला.