अधिवेशनात ‘राडेबाजी’! भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार?

भाजपच्या या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात पहिलाच दिवस सर्वाधिक वादग्रस्त ठरला आहे. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यानंतर भाजपने कारभारावर बहिष्कार टाकत सभागृहाचा त्याग केला आहे.

या 12 आमदारांचे निलंबन

 1. डॉ. संजय कुटे (जामोद, जळगाव)
 2. आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)
 3. अभिमन्यू पवार (औसा, लातूर)
 4. गिरीश महाजन (जामनेर, जळगाव)
 5. अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व, मुंबई)
 6. पराग अळवणी (विलेपार्ले, मुंबई)
 7. हरिश पिंपळे (मूर्तिजापूर, अकोला)
 8. राम सातपुते (माळशिरस, सोलापूर)
 9. जयकुमार रावल (सिंदखेडा, धुळे)
 10. योगेश सागर (चारकोप, मुंबई)
 11. नारायण कुचे (बदनापूर, जालना)
 12. कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर, चंद्रपूर)

(हेही वाचाः विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की! काय आहे कारण?)

भाजपच्या या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत या 12 आमदारांना नागपूर आणि मुंबई येथील विधान भवन परिसरात उपस्थित राहण्याची बंदी घालण्यात आली आहे.

काय झाले नेमके?

विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव विराजमान झाले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावरुन मांडलेल्या मुद्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडण्याची संधी मागितली. पण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ती संधी नाकारल्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न भाजप आमदांरानी केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. सभागृह तहकूब केल्यानंतर भाजप आमदार विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून अध्यक्षांच्या दालनात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी ही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे.

अनिल परब यांनी मांडला ठराव

तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि त्यांच्यासोबत हमरीतुमरी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मांडला. या प्रस्तावाला बहुमताने मंजूर करण्यात आले.

(हेही वाचाः सरकारने लोकशाहीला कुलूप लावले! देवेंद्र फडणवीस आक्रमक)

विरोधकांचा बहिष्कार

मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ओबीसी आरक्षणासंबंधी ठराव करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सभागृहात आमचं संख्याबळ कमी करुन आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणी शिवी दिली हे आम्हाला माहीत आहे. आणि त्याबाबतचं सत्य समोर येईलच. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी एकतर्फी निर्णय देऊन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्ही निषेध करतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. या निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here