शिंदे गटाच्या खासदारांना लोकसभेतही मिळणार स्वतंत्र गटाची मान्यता?

136

शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. या बाराही खासदारांनी मंगळवारी दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता हे 12 खासदार शिंदे गटात जाणार असून, लवकरच ते लोकसभा अध्यक्षांना नव्या गटनेतेपदासाठी पत्र देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी त्यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. हे 12 खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याचे सांगण्यात येत असले तरी पुन्हा एकदा राज्य विधीमंडळासारखा कायदेशीर पेच लोकसभेतही निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

(हेही वाचाः शपथपत्र लिहून दिलेल्या शिवसैनिकांचीही पक्षातून एक्झिट?)

शिंदे गटासमोर अडचण

महाराष्ट्रातील 18 तर दीव दमणच्या खासदार कलाबेन डेलकर मिळून लोकसभेत शिवसेनेचे 19 खासदार आहेत. त्यामुळे घटनेतील पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला 13 खासदारांची गरज आहे. तसेच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना गटनेते म्हणून नेमकं कोणाच्या नावाने पत्र द्यायचं ही सर्वात मोठी तांत्रिक अडचण असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदेंचा गट स्थापन होणार?

शिवसेनेच्या मुख्य प्रतोद भावना गवळी शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याऐवजी राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. पण 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना आपल्या सहीचे पत्र देण्यासाठी आता लोकसभा सचिवालयाकडून बदल सूचवण्यात आले आहेत. भावना गवळी यांच्या नावाने खासदारांना हे पत्र देण्याचे सचिवालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभेतही एकनाथ शिंदे आपल्या खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्यात यशस्वी होणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः …आणि कदमांना अश्रू अनावर, म्हणाले “50 वर्षात जे उभारलं ते पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं”)

12 खासदारांनी घेतली भेट

श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाणे, भावना गवळी, हेमंत पाटील,प्रतापराव जाधव,श्रीरंग बारणे, संजय मंडलिक,सदाशिव लोखंडे,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, धैर्यशील माने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली आहे. हे 12 खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.