भाजपचे ते ‘बारा’ आता ठाकरे सरकारचे ‘12’ वाजवणार? घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारविरोधात आता भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान तालिकाध्यक्षांना शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. मात्र आता या निलंबित १२ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने, राज्यातील वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. राज्य सरकारविरोधात आता भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले शेलार?

१२ आमदारांचे निलंबन हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे. आमच्या सर्व १२ आमदारांचे आम्ही चार गट केले असून, चार याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. ज्या ठरावाने आम्हाला निलंबित करण्यात आले, तो ठराव अवैध ठरवण्यात यावा अशी मागणी आम्ही या याचिकेत केली आहे. तसचे तात्पुरती स्थगिती मिळावी आणि आम्हा सर्व आमदारांना न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत सर्व अधिकार बहाल करण्यात यावेत, अशीही आम्ही विनंती न्यायालयाला केली आहे. आम्ही शेवटपर्यंत लढाई लढू, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील, असे आमदार आशिष शेलार यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः भाजपचे ‘ते’ 12 आमदार आता वर्षभर वेतनाविनाच? वाद आणखी चिघळणार)

याआधी राज्यपालांना भेटले

भाजपच्या निलंबित 12 आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना एक निवेदनही दिले होते. ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असल्याचे आमदारांनी त्यावेळी सांगितले. आम्हाला बोलू द्या, अशी मागणी केली असताना भाजप आमदारांवर शिवीगाळ केल्याचा खोटा ठपका ठेवत निलंबित केले असल्याचे निवेदनात म्हटले होते. भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. तरीही लोकशाहीच्या प्रथा, परंपरा गुंडाळून लोकशाहीचा गळा घोटून महाविकास आघाडीकडून सभागृहाचे कामकाज चालवले जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आमच्यावर केलेले आरोप आम्हाला अमान्य असून, उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच आमच्यावर हातापाई केली असल्याचेही निवेदनात म्हटले होते.

नेमकं काय घडलं?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर भाजपच्या काही आमदारांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार उघडकीस आला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घडलेल्या प्रकाराची वस्तुस्थिती सभागृहाच्या पटलावर मांडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांवर एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. भाजपने विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अभिरुप सभागृह भरवून, या प्रकारचा तीव्र निषेध केला.

(हेही वाचाः देशमुख, ठाकरे सरकारला मोठा धक्का… उच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका)

कोण आहेत ते १२ आमदार

आमदार डॉ. संजय कुटे, आशीष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, बंटी भांगडिया, योगेश सागर, जयकुमार रावल, नारायण कुचे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार व हरीश पिंपळे या भाजप आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here