महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. यासोबतच देशातील विविध १३ राज्यपाल, उपराज्यपालांची विविध राज्यांत नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्तावावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून राष्ट्रपती कार्यालयाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी
१. महाराष्ट्र राज्यपाल – रमेश बैस, २. अरुणाचल प्रदेश राज्यपाल – लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, ३. सिक्किम राज्यपाल – लक्ष्मण प्रसाद आचार्य, ४. झारखंड राज्यपाल – सीपी राधाकृष्णन, ५. हिमाचल प्रदेश राज्यपाल – शिवप्रताप शुक्ला, ६. आसाम राज्यपाल – गुलाबचंद कटारिया, ७. आंध्र प्रदेश राज्यपाल – निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, ८. छत्तीसगड राज्यपाल – विश्वभूषण हरिचंदन, ९. मणिपूर राज्यपाल – अनुसुईया उईके, १०. नागालँड राज्यपाल – एल गणेशन, ११. मेघालय राज्यपाल – फागू चौहान, १२. बिहार राज्यपाल – राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, १३. लडाख – लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा.
वरील सर्व नेमणूका त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असतील, असेही पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community