सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना दररोज मोठ मोठे धक्के मिळत आहेत. कालपर्यंत विधिमंडळातील आमदारांनंतर महापालिका, नगरपालिकेतील नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी शिंदे गटात सामील होण्याचा सपाटा लावलेला आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. कारण सोमवारी, १८ जुलै रोजी शिंदे गटाने ट्रायडेंड हॉटेलात खासदारांची बैठक आयोजित केली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल १४ खासदार ऑनलाइन या बैठकीत सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
शिवसेनेत उभी फूट
शिंदे गटाच्या या बैठकीत शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी तब्बल १४ खासदार सहभागी झाल्यामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर मोठे भगदाड पडणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे गट आता राष्ट्रीय पातळीवर मोट बांधणी करत आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे येत्या २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची याचिका आणि शिंदे गटाच्या याचिका यांवर सुनावणी होणार आहे. यावेळी शिंदे गटाची शिवसेना अधिकृत की उद्धव ठाकरे यांची शिवसेना अधिकृत आहे, याचा निवडा होणार आहे. त्याआधीच शिंदे गटाच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. शिवसेनेत उभी फूट पडत आहे.
(हेही वाचा राज्यात ‘मॅक्सी कॅब’ला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध)
Join Our WhatsApp Community