उध्दव ठाकरेंच्या बैठकीला १७ माजी नगरसेवक गैरहजर

115

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर आणि त्यातच शिंदे गट फुटून गेल्यानंतर बिथरलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या पंखात बळ भरुन त्यांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची उर्मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निर्माण केली. शिवसेना भवनमध्ये अत्यंत तातडीने उध्दव ठाकरे यांनी २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीला आजारपण तसेच मुंबईबाहेर असणे तसेच अन्य कारणांमुळे तब्बल १७ जण गैरहजर राहिले. त्यामुळे पहिल्याच माजी नगरसेवकांच्या बैठकीत १७जणांच्या गैरहजेरीमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला असून यापुढे तरी सर्व माजी नगरसेवकांच्या बैठका घेऊन त्यांना सक्रीय ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

( हेही वाचा : …म्हणून आशिष शेलारांना दुसऱ्यांदा बनवले भाजपने मुंबई अध्यक्ष! )

शिवसेना फुटल्यानंतर मातोश्रीवर सर्व प्रथम माजी नगरसेवकांना बोलावण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी पहिली बैठक घेत त्या सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. गुरुवारी दुपारी माजी नगरसेवकांची बैठक घेण्याचा निर्णय घेत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता या बैठकीचे आयोजन शिवसेना भवनवर करण्यात आले होते. सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले असून अपक्षांसह मनसेचे सहा नगरसेवक आणि जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावर निवडून आलेले अशाप्रकारे एकूण शिवसेनेच्या एकण् नगरसेवकांची संख्या ९७ एवढी झाली होती. शिवसेना भवनवर उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, दहिसरच्या शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, वैशाली शेवाळे आणि आमदार दिलीप लांडे आदी माजी नगरसेवक हे गैरहजर होते. या व्यतिरिक्त १० नगरसेवक हे आजारी असल्याची कारणे देत बैठकीला गैरहजर राहिले, या आजारी नगरसेवकांमध्ये माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत, चित्रा सांगळे, अर्चना भालेराव, शुभदा गुडेकर आदी नगरसेवकांचा समावेश आहे. तर तेजस्वीनी घोसाळकर, आशिष चेंबूरकर, सुरेश पाटील, खुरसुंगे आणि संजय घाडी हे मुंबई बाहेर असल्याने बैठकीला आले नसल्याची माहिती मिळाली तर युवा सेनेचे पदाधिकारी अमेय घोले आणि आकांशा शेट्ये यांनी पक्षातील वरिष्ठांना कल्पना देत गैरहजरी नोंदवली असल्याची माहिती मिळत आहे.

गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर हीच ती वेळ – उद्धव ठाकरे

तर अन्य माजी नगरसेवक हे आजारी असल्याने आले नसल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी तुम्ही नगरसेवक असताना जसे विभागात काम करत होता,तसेच काम करत जा. आपण माजी नगरसेवक झालो म्हणून काम करायचे सोडू नका, जनतेच्या संपर्कात रहा आणि काम करा. तुम्ही तुमच्या वार्डात जाऊन फिरा , लोकांची जास्तीत जास्त कामे करा. या निवडणुकीत गद्दारांना चांगलाच धडा शिकवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. जे गद्दारी करून सोडून गेले त्यांना जाऊ द्या. आणखीन कोणाला जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. त्यांच्यावाचून आपले काही अडत नाही. मात्र गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर हीच ती वेळ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुका कधी होतील ते नेमके सांगता येणार नाही. कारण की, ‘त्यांनी’ ( शिंदे गट) २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र आता निवडणुका झाल्या तर शिवसेनाच पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळेच ते निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप – शिंदे गटाच्या सरकारचे नाव न घेता केला. यावेळी, शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार अनिल परब, आमदार. रवींद्र वायकर, उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.

New Project 4 6

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.