मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेला स्थानिक पातळीवर देखील मोठा धक्का बसत असून, शिवसेनेचे नगरसेवक, जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. अशातच मीरा-भाईंदर महारालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक, शिवसनेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज, गुरूवारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. तसेच शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
शिंदे गटाला देणार पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व नगरसेवक शिंदे गटात गुरूवारी दाखल होत आहेत. मीरा-भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षांत शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान 18 शिवसेना नगरसेवक, तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्या कार्यकारणीतील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक गुरूवारी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिंदे यांचा सत्कार करणार असून शिंदे गटाला पाठिंबा देणार आहे.
(हेही वाचा – गडचिरोलीतील 8 तालुक्यात पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला)
उल्हासनगरचे नगरसेवक शिंदे गटात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिवसेनेतील अनेक जिल्ह्यांतील पदाधिकारी, नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहेत. ठाणे, नवी मुंबईनंतर आता उल्हासनगर महापालिकेतील 15 हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटाला आपले समर्थन दिले आहे. तसेच दिंडोरी आणि नाशिक इथल्या शिवसेनेचे नगरसेवक आमच्या पाठिशी असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community