संजय राऊतांकडून अहिल्याबाई होळकरांचा अवमान! वंशज भूषणसिंह राजेंनी खडसावले! 

119

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये ‘रोखठोक’ या त्यांच्या लेखात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासोबत केली. त्यावर आक्षेप घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत शब्दांत पत्र लिहिले आहे. ‘राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेतेमंडळींशी  करत असाल, तर या पुढे ते बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत’, अशा शब्दांत श्रीमंत भूषणसिंह राजे यांनी गर्भित इशारा दिला आहे.

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर काय म्हणाले पत्रात? 

  • आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिलेला लेख वाचला. आपल्याला अत्यंत खेदाने सांगू इच्छितो की, ज्या पद्धतीने त्यांनी तो लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते.
  • आपण पक्षीय राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा. पण त्यामध्ये जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना आजच्या नेतेमंडळी करीत असाल, तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही.
  • रयतेचे कल्याण हेच सर्वतोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या एका नेत्यांशी कदापि होऊ शकत नाही. आधी माॅ साहेबांचे विचार आचरणात आणा. त्यांच्यासारखा रयतेचा सांभाळ करा. मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही.

holkar

(हेही वाचा : राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, तरी नवीन जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा! )

संजय राऊत यांनी काय लिहिले? 

  • ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले.
  • या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल. होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता.
  • अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले.
  • अहिल्याबाईंचा आपल्या समोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ, असा त्यांचा विश्वास होता. अहिल्याबाईंकडे त्यावेळी फक्त पाचशे महिलांचे पथक होते. त्यांच्या ताकदीवर अहिल्याबाई युद्धास सज्ज झाल्या.
  • त्याआधी त्यांनी नर्मदेपलीकडे डेरा टाकलेल्या राघोबा दादास निरोप पाठवला, तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हातात भाला आणि माझ्या पाचशे वीर महिलांना घेऊन मैदानात उतरले तर तुमची पळता भुई थोडी होईल. हरलात तर काय होईल? मी बाई माणूस असल्याने मला कोणीच हसणार नाही. पण तुमचा पराभव माझ्याकडून झाला तर जगास तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही.
  • राघोबा दादाला हा निरोप मिळताच त्याचे डोके ठिकाणावर आले. त्याने मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालात यापेक्षा वेगळे काय घडले?
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.