वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह लागोपाठ तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. सातत्याने होणार्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतीतून उत्तर दिले असून, केंद्राकडून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून आले आहे. त्यामुळे सुमारे २ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी त्यासंदर्भात घोषणा केली. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात २ हजार कोटींची गुंतवणूक येणार असून, त्यामाध्यमातून ५ हजारांवर रोजगार निर्मिती होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील होते. गेल्या दोन महिन्यांत अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. आता फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्राला मिळालेले हे एक मोठे गिफ्ट आहे.
- 297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार
- 492.85 कोटी रुपये खर्च केले जाणार
- 207.98 कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार
- आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरु, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक
- इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात येणार