2024 Year निवडणुकांमुळे विविध देशांत ठरणार अविस्मरणीय

218
‘मिशन 2024’ ची चर्चा देशात गेली वर्षभर सुरु आहे. मात्र भारतासोबतच जगभरातील विविध देशांमध्ये 2024 Year मध्ये वर्षात निवडणुका होणार आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. भारत, अमेरिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, रशिया, इराण अशा अनेक छोट्या-मोठ्या देशांमध्ये येत्या वर्षभरात निवडणुकांचे पडघम जोरात वाजणार आहेत. या देशांतील निवडणुकांच्या निकालामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठे बदल बघायला मिळतील. एकूणच हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणून जनतेच्या लक्षात राहील.
देशात एप्रिल-मे महिन्यात भारतात लोकसभेची निवडणूक होणार आहे. तर महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, हरियाणा आणि जम्मू व काश्मीर या राज्यांची विधानसभेची निवडणूक  होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर विरोधकांकडूनही इंडी आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक रंगणार  

भारतापाठोपाठ सर्वात मोठ्या लोकशाही देशांमध्ये अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्येच सरळ लढत होण्याची शक्यता आहे. 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता.

बांग्लादेशात शेख हसिना पुन्हा सत्तेत येणार? 

भारताशेजारील पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या तीन देशांमध्येही निवडणुका आहेत. बांग्लादेशात सात जानेवारीला निवडणूक होणार असून पंतप्रधान शेख हसिना पुन्हा पाचव्यांदा सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

पाकिस्तानात स्थिर सरकार येणार? 

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या निवडणुकीकडे भारताचेही लक्ष लागले आहे. पाकिस्तानातील निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि इम्रान खान यांच्या पक्षात लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यानंतर देशात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

रशिया, युक्रेनमध्येही निवडणूक रंगणार 

रशिया आणि इराणमध्येही यावर्षी निवडणुका आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धाचे पडसाद रशियाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. पण ही निवडणूक किती पारदर्शकपणे पार पडेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये निवडणुका असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पण सद्यःस्थितीत अध्यक्षीय निवडणूक होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

इंग्लंड आणि युरोपमध्येही निवडणुका 

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंडमधील यावर्षीच्या निवडणुकीत केंद्रबिंदू ठरणार आहेत. देशात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. युरोपमध्ये नऊ संसदीय निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ताबदल आणि धोरणांमध्येही अनेक नवीन बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तैवानमधील निवडणुकही यंदा महत्त्वाची मानली जात आहे. तैवानमध्ये 13 जानेवारी रोजी मतदान होत असून चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कुणाची सत्ता येणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या अमेरिकेशी चांगले संबंध असलेले लाय चिंग हे आघाडीवर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोदो हे अपात्र ठरत असल्याने तिथे यावर्षी नवीन नेत्याकडे हे पद जाणार असल्याचे निश्चित आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.