अजित पवार कधी बोलणार ‘त्या’ शपथविधीविषयी? कधी येणार ती योग्य वेळ?

'पहाटेचा शपथविधी' ही शरद पवारांचा महाविकास आघाडी नावाचा पूर्णत्वास आलेला खेळ मोडणारी घटना होती.

‘२३ नोव्हेंबर २०१९’ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारा दिवस होता. त्याचा केंद्रबिंदू सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्या दिवशी महाराष्ट्राची जनता सकाळी झोपेतून उठत नाही तोच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्याचे वृत्त समजले आणि हल्लकल्लोळ माजला. पुढे तो ‘पहाटेचा शपथविधी’ नावाने चर्चेत येऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावेळी घेतली. अवघ्या दोघांनी सरकार स्थापन केले आणि तीन दिवसांत पडलेही. यावर अजित पवार कधीच सविस्तर बोलले नाहीत. असे करण्यामागे त्यांची काय भूमिका होती, ती अजून त्यांच्या मनातील कप्प्यात बंदिस्त आहे. त्या शपथविधीवर अजित पवार कधी बोलणार? कधी येणार ती वेळ? असा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला २ वर्षांनंतरही पडला आहे.

शरद पवारांचा खेळ मोडणारा होता ‘पहाटेचा शपथविधी’

२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली. निकाल लागला तेव्हा कुणाही एका पक्षाला बहुमत नव्हते. मात्र भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या आणि सेनेला ५६! सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या सेनेला सोबत घेऊन हालचाली सुरु झाल्या खऱ्या, मात्र सेनेने अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद विभागून वाटण्याची अट घातली, तसा शब्द अमित शहा यांनी बंद खोलीत दिला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आणि युतीत मिठाचा खडा पडला. त्यानंतर लागलीच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले, शिवसेना नेते संजय राऊत यांना हाताशी धरून भाजपाला बाजूला ठेवून शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार  २८ नोव्हेंबर रोजी स्थापन केले. मात्र त्या दरम्यान शरद पवारांचा पूर्णत्वास आलेला खेळ मोडणारी घटना घडली होती, ती म्हणजे ‘पहाटेचा शपथविधी’!

(हेही वाचा कृषी कायद्यांविरोधातील राज्याची आता ‘ती’ विधेयकेही रद्द होणार?)

…आणि अजित पवारांनीच पाडले सरकार!

दोन-तीन दिवसांत महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार, असे वातावरण होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी त्यांचे त्यांचे आमदार हॉटेलात बंदिस्त ठेवले होते. बहुमताचा आकडा सुरक्षित केला होता. अशा परिस्थितीतूनही अजित पवार २२ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री काका शरद पवारांच्या कंपूतून निसटले आणि थेट देवेंद्र फडणवीस यांना जाऊन मिळाले. बहुमतासाठी आवश्यक ४० आमदारांची यादी दाखवून सरकार स्थापन करूया, असे म्हणाले. त्यानंतर लागलीच २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राजभवनात शपथविधी पार पडला. ‘मी पुन्हा येईन…’ म्हणणारे फडणवीस खरोखरीच आले. पुढे तीन दिवस हे सरकार चालले, पण शेवटी अजित पवार यांना बहुमतासाठी ४० आमदारांचा पाठिंबा मिळवता आला नाही आणि ज्या अजित पवारांच्या विश्वासावर सरकार स्थापन झाले त्याच अजित पवारांमुळेच तीन दिवसांत हे सरकार पडले. अजित पवार हे मंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा काकांना जाऊन मिळाले. आणि २३ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

अजित पवार या प्रश्नांची उत्तरे कधी देणार? 

या घटनेला आज दोन वर्षे झाली आहेत. या घटनेवर सर्वांनी मत प्रदर्शन केले. खुद्द देवेंद्र फडणवीस हेही बोलले. अजित पवारांनी बहुमतासाठी आवश्यक आमदार संख्येची शाश्वती दिली होती म्हणून सरकार स्थापन केले, असे कारण त्यांनी वेळोवेळो दिले आहे. मात्र या घटनेच्या केंद्रस्थानी राहिलेले अजित पवार मात्र आजही यावर खुलेपणाने बोलले नाहीत. काकांच्या विरोधात जाऊन बंड का केला होता? महाविकास आघाडीची मोट बांधून तयार असतानाही फडणवीस यांना भेटून का सरकार स्थापन केले? ज्या ४० आमदारांचा पाठिंबा सांगितला, ते आमदार का फिरले? पुन्हा काकांकडे गेल्यावर अजित पवार यांनी अशी काय भूमिका मांडली कि महाविकास आघाडीमध्येही ते उप मुख्यमंत्री झाले? सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवार यांनी हा सगळा खटाटोप कशा करता केला होता?, या सर्व प्रश्नांची उत्तरे अजित पवार यांच्या मनातील कप्प्यात बंदिस्त आहेत, त्यावर ते का बोलत नाहीत की त्यांना ही उत्तरे अशीच मनात ठेवून भविष्यात असेच काही प्रयोग करण्याचा मनसुबा आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

(हेही वाचा मंत्री परबांच्या निवासस्थानी का वाढवला पोलिस बंदोबस्त? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here