Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस? नाना पटोलेंना हटवण्याची मागणी

114
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू झालेली धुसफूस थांबण्याची चिन्हे नाहीत. आता विदर्भ काँग्रेसमधील नेत्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात आघाडी उघडली असून, त्यांना तात्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
पटोले यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्यांमध्ये विदर्भातील २४ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पटोले यांना हटवा आणि शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हीच मागणी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात हायकमांडकडे केली जाणार असल्याचे कळते. अशा वेळी चेन्नीथला आपला अहवाल सादर करतील. प्रदेश काँग्रेस अध्यक्षाबाबत ते नवी नावे सुचवतील. तसेच नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला, या संदर्भात ते टिप्पणी करण्याची शक्यता आहे.

पटोलेंवर आरोप काय?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कुणाचेही ऐकत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली आहे. पटोले यांनी काँग्रेसच्या व्होट बँकेला पक्षापासून दूर ठेवले आहे. दलित, मुस्लिम यांना दूर लोटण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना हटवा, अशी मागणी शिवाजीराव मोघे यांच्या समर्थकांनी काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्नीथला यांच्याकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.