बहुचर्चित अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी २५६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे.
( हेही वाचा : देशात बालविवाहांच्या संख्येत वाढ, 22 कोटींहून अधिक बालिका वधू )
ही मतदान प्रक्रिया नि:पक्षपणे पार पडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वस्तरीय कार्यवाही सुरू आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मतदान यंत्रांचे ‘द्वितीय सरमिसळीकरण’ केंद्रीय निरीक्षक देवेश देवल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. हे सरमिसळीकरण नि:पक्षपणे व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे यांनी दिली.
२४ तास देखरेख
या पोटनिवडणूक प्रक्रियेकरिता २५६ मतदान केंद्रे असणार असून या मतदान केंद्रांवर ३३३ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात जेवढ्या यंत्रांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आहेत. तर सुमारे ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रांची तजवीज करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे होऊ शकेल. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उपयोगात येणारी यंत्रे ही सशस्त्र सुरक्षादलाच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community