लष्कराच्या पूर्व कमांडने कोलकात्यामध्ये संशयास्पदरित्या खरेदी झालेल्या १० सीमकार्ड संदर्भात सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली होती. त्यासंदर्भात वेळेत तपास झाला असता, तर मुंबईवरील २६/११ चा हल्ला टाळता आला असता, असे मत रस्ते आणि परिवहन राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी व्यक्त केले.
पांचजन्यतर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी फोर्ट येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्राला संबोधित करताना सिंह म्हणाले, २६/११ चा हल्ला होण्याआधी मी कोलकात्यात लष्कराच्या पूर्व कमांडचा प्रमुख होतो. त्याआधी काश्मिरात सेवा बजावली होती. तेथे खबऱ्यांचे नेटवर्क उभारले होते. त्यांच्याकरवी गुप्त माहिती मिळाली की, कोलकात्यामधून एका संशयास्पद व्यक्तीने १० सीमकार्ड खरेदी केले आहेत. ही माहिती मी तत्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवली.
( हेही वाचा: इस्लामपासून दहशतवाद बाजूला करण्यासाठी सौदी आणि यूएईला भारताची साथ – राम माधव )
२६/११ चा कट आखण्यासाठी त्यातील ४ सीमकार्ड वापरण्यात आली होती. हल्ल्यानंतरच्या तपासात ही माहिती समोर आली. परंतु, मी दिलेल्या इनपुटचा योग्यवेळी वापर झाला असता, तर हा हल्ला झालाच नसता, असे सिंह यांनी सांगितले.
प्रत्युत्तर उशिरा दिले
२६/११ हल्ल्यावेळी प्रत्युत्तराची कारवाई उशिरा सुरू झाली. मुंबई पोलीस उत्तर देत होते. पण व्यापक मिशनसाठी एनएसजी कमांडोंना बोलावण्यात आले. मात्र, या सगळ्यात आपण विसरलो, आपल्या बाजूला कुलब्याला लष्कराची एक बटालियन आहे. ती अशा प्रसंगांना तोंड देण्यास प्रशिक्षित आहे. तिचा वापर करता आला असता. पण तसे झाले नाही, अशी नाराजी सिंह यांनी व्यक्त केली.