अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ३०० रुपयांचे तिकीट; सावरकर प्रेमींकडून आक्षेप

110

अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये लाईट अॅण्ड साऊंड शोसाठी ३०० रुपये आकारले जात असल्याने सावरकर प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे ज्यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी गौरव यात्रा काढल्या जात असताना, दुसरीकडे त्यांच्याविषयीच्या लाईट अॅण्ड साऊंड शोसाठी ३०० रुपयांचे शुल्क घेणे हे शासन धोरणाशी सुसंगत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याविषयी बोलताना सावरकरप्रेमी हरपाल सिंह राणा म्हणाले, सेल्युलर जेलमध्ये प्रवेशासाठी पर्यटकांकडून ३० रुपये घेतले जातात. शिवाय तुरुंग भ्रमंती आणि लाईट अॅण्ड साऊंड शो पाहण्यासाठी तब्बल ३०० रुपये आकारले जातात. त्यात चार लाईट असतात आणि शहिदांच्या कार्याविषयी माहिती दिली जाते. अंदमानमध्ये शिक्षा भोगताना स्वातंत्र्यसैनिकांवर कसा अन्याय झाला, त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी कसा त्याग केला, कसे बलिदान दिले, याविषयी माहिती ऐकवली जाते.

(हेही वाचा केवळ सावरकरांचे पुतळे उभारून चालणार नाही, त्यांचे विचार पोहोचणे गरजेचे – रणजित सावरकर)

परंतु, ज्या क्रांतिकारकांचा इतिहास घराघरात मोफत पोहोचवला पाहिजे, त्यासाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यावर आमचा आक्षेप आहे. हल्लीच्या जमान्यात ३०० रुपये खर्च करून कोणी इतिहास का ऐकेल? स्वातंत्र्यसैनिकांची गाथा मोफत ऐकवली गेली पाहिजे; तरच ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. यासंदर्भात आम्ही संबंधितांना विचारले असता, त्यांनी आधी उत्तर देणे टाळले. शेवटी अनेक प्रयत्नांती त्यांचे उत्तर आले, ‘इथल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आम्ही पर्यटकांकडून ३०० रुपये घेतो’. पण, सेल्युलर जेलमधील २०-२५ कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके पैसे सरकारकडे नाहीत का, असा सवालही राणा यांनी उपस्थित केला.

१६ एप्रिलला दिल्लीत आंदोलन

सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करण्यासाठी ३० रुपयांचे सामान्य शुल्क आकारले जाते. त्याविषयी आम्हाला आक्षेप नाही. परंतु, लाईट अॅण्ड साऊंडसाठी आकारले जाणारे ३०० रुपयांचे शुल्क रद्द करा, अशी मागणी हरपाल सिंह राणा यांनी केली. यासंदर्भात आम्ही दिल्लीमध्ये जंतरमंतरवर आंदोलन केले होते. त्यात सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या २५ हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. येत्या १६ तारखेला याच मैदानावर आम्ही हे आंदोलन पुन्हा सुरू करणार आहोत, असेही राणा यांनी सांगितल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.