मुंबईत विविध सेवासुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याच्या कामांमध्ये घोटाळ्याचे आरोप असल्याने यापूर्वी मागवलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या असून पुढील तीन वर्षांसाठी ३८३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे, मागील वेळेस उणे ३० ते ४० टक्के आकारल्याने निविदा रद्द करण्यात आली होती. परंतु या निविदेमध्ये उणे १८ ते २७ टक्के दराने निविदेत भाग घेत काम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये यापूर्वी रस्ते घोटाळा प्रकरणी काळ्या यादीतील महावीर कंस्ट्रक्शन आणि न्यू इंडिया रोडवेज या कंपनी पात्र ठरल्या आहेत. त्यांचा शिक्षेचा कालावधी संपुष्टात आल्याने महापालिकेने त्यांना निविदेमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली आहे.
तीन महिन्यांकरता कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा निर्णय
मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह इतर खासगी संस्थांच्या माध्यमातून सेवासुविधांचे जाळे टाकण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी खोदण्यात येणारे चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी सात याप्रमाणे स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक २०१९मध्ये दोन ऐवजी स्थायी समितीच्या मंजुरीने तीन वर्षांकरता करण्यात आली आहे. हा कालावधी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेने ऑक्टोबर २०२१ रोजी निविदा मागवली होती. परंतु आजवर उणे ३० ते ४० टक्के कमी आल्याने निविदा रद्द करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या चर बुजवण्याच्या कामांच्या निविदा अधिक ६ टक्के ते उणे चार टक्के दराने आल्यानंतरही तांत्रिक कारण देत रद्द केल्या. त्यामुळे फेब्रुवारी २०२२पर्यंत तीन महिन्यांकरता कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला. या तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये प्रत्येक परिमंडळांना वाढवून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राट कामांवर आतापर्यंत ३९६ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले आहे. त्यात २१ कोटी रुपयांची भर पडल्याने हे कंत्राट ४१७ कोटी ५६ लाख रुपये एवढे झाले होते.
(हेही वाचा मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा! नितेश राणेंनी का केली मागणी?)
कंत्राट पावसाळ्यासह तीन वर्षांच्या कालावधीसाठी
मात्र यासाठी नव्याने मागवलेल्या निविदेत सात परिमंडळांमध्ये महापालिकेच्या ५०४ कोटी रुपयांच्या अंदाजित रकमेपेक्षा ३८३.०३ कोटी रुपयांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावल्या आहेत. हे कंत्राट पावसाळ्यासह तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. मागील कंत्राटामधील केवळ आर्मस्ट्राँग हा एकमेव कंत्राटदार याही कामांमध्ये पात्र ठरला असून उर्वरीत सहा परिमंडळांमध्ये सर्व नवीन कंत्राटदारांनी कामे मिळवली आहे.
- परिमंडळ १: न्यू इंडिया रोडवेज ( कंत्राट- ६० कोटी ७७ लाख ६० हजार, दर : उणे २४ टक्के)
- परिमंडळ २: आर्मस्ट्राँग कन्स्ट्रक्शन (कंत्राट- ५० कोटी ९१ लाख १० हजार, दर : उणे २७.२७ टक्के)
- परिमंडळ ३: स्पेको इन्फास्ट्रकचर (कंत्राट- ४४ कोटी ८२ लाख ६० हजार, दर : उणे २५.२९टक्के)
- परिमंडळ ४: कमला कस्ट्रक्शन कंपनी (कंत्राट- ६७ कोटी ५०लाख, दर: उणे-२५ टक्के)
- परिमंडळ ५: लँडमार्क कार्पोरेशन (कंत्राट- ५४ कोटी २१ लाख, दर-२७.७२ टक्के)
- परिमंडळ ६: मानसी कंस्ट्रक्शन(कंत्राट- २६ कोटी ९१ लाख ५० हजार, दर : २३.१० टक्के)
- परिमंडळ ७: महावीर कंस्ट्रक्शन कंपनी (कंत्राट- ७७ कोटी ९० लाख, दर :१८ टक्के)