बार मालकाकडून वसूल केलेले 4 कोटी 70 लाख रुपये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले, अशी कबुली सचिन वाझे याने दिली. ईडीने वाझे याची तळोजा कारागृहात जाऊन त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने ही माहिती दिली. यात देशमुख क्रमांक १ चे होते, असेही वाझे म्हणाला.
१०० कोटींपैकी ६० कोटीच्या व्यवहाराची माहिती मिळाली!
बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये वाझेला दिले होते, जे देशमुखांना गेले, असेही वाझेने ईडी चौकशीत मान्य केले. ईडीने आतापर्यंतच्या तपासात 50 ते 60 कोटी रुपयांच्या ट्रांजेक्शनची माहिती मिळवली. काही पैसे हे वाझे सीआययुमध्ये करत असलेल्या हायप्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे. ईडीने कोर्टाची परवानगी घेऊन तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेची चौकशी केली, ज्या चौकशीदरम्यान वाझेने या गोष्टी सांगितल्या अशी सूत्रांची माहिती आहे.
(हेही वाचा : परमबीर सिंग चौकशीसाठी गैरहजर, ईडीकडे मागितला वेळ!)
देशमुखांच्या दुसऱ्या मुलाचीही होणार चौकशी?
ईडीकडून लवकरच अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांना समन्स जाण्याची शक्यता आहे. सलील देशमुख यांच्या कंपनीने उरण तालुक्यात खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास ईडीने सुरू केला. उरण तालुक्यातील धुटूम गावात सलील देशमुख यांची गुंतवणूक असलेल्या प्रीमियर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 15 प्लॉट खरेदी केले. ज्यांची किंमत 300 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती मिळत आहे. ही जागा 8.3 एकर इतकी असून पळस्पे फाटा ते जेएनपीटी या परिसरात आहे. ईडीकडून सुरू असलेल्या तपासात जमीन खरेदी करणारी कंपनी ही सलील देशमुख चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याअनुषंगाने लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community