Sambhajinagar : मंत्रीमंडळ बैठकीत संभाजीनगरमध्ये मराठवाड्यासाठी ४० हजार कोटींचे प्रस्ताव

सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत ५० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती.

158
Cabinet Meeting : प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पडणार महागात; 'या' शिक्षेची असणार तरतूद

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तब्बल सात वर्षांनंतर मराठवाडयात मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत ५० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मराठवाड्यातील बैठकीत तब्बल ४० हजार कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव असल्याचे समजते. मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी २१ हजार कोटींची तरतूद आहे. या बैठकीत कृषी विभागासाठीही ६०० कोटींचे प्रस्ताव येणार असल्याचे समजते. विरोधी पक्षांकडून मात्र राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. मराठवाडयात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट आहे. जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. उपोषण संपले असले तरी त्याठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुददा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाडयासाठी तब्बल ४० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर होतील असे समजते. गेल्या आठवडाभरापासून मंत्रालयात विविध विभागांकडून प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू होती. हे प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहेत.

तब्बल तीन तास ही मंत्रीमंडळ बैठक चालणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पत्रकारपरिषदेत मराठवाडयासाठी घेण्यात आलेल्या महत्वाच्या निर्णयांची घोषणा करतील. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ, प्रधान सचिवांपासून विविध विभागांचे सचिव, उपसचिव, सहसचिव, विविध मंत्र्यांचे स्वीय सहायक, सुरक्षा यंत्रणा यासह सर्व जवळपास ५०० जणांचा ताफा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होत आहे. बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तींसाठी शेकडो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शासनाचे शहरातील सर्व विश्रामगृह कमी पडत असल्याने खासगी सर्वोत्तम व्यवस्था असलेली हॉटेलही आरक्षित करण्यात आली आहेत.

कॅबिनेट बैठक की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन – विजय वडेट्टीवार

मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे. यावरून दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली असून मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे असेही ते म्हणाले.

राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा सवाल करत फाईव स्टार हॉटेल ३० रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल ४० रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल ७० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर ४० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी १०० रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन १०० (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे-२० ( इतर अधिकारी) एकूण १५० गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील देखील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा – BMC : विविध संस्थांच्या ताब्यातील भूखंडांनाही लागू होणार नवीन धोरण, तर खर्चाच्या ५० टक्के रक्कम संस्थांना देणार नारळ)

दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ – नाना पटोले

राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रिमंडळ बैठकीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शासन आपल्या दारी म्हणत जनतेच्या पैशावर कार्यक्रम करुन स्वतःची जाहीरातबाजी करते. हे सरकार असंवेदनशील असून जाहीरातबाजी, इव्हेंटबाजी व आता मंत्रिमंडळ बैठकीवर वारेमाप खर्च करणारे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असेही पटोले म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.