मंत्रालय ते विधानभवन आणि त्यापुढील मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या ४०० कोटींच्या भुयारी मार्गाचे काम अर्धवट थांबवण्यात आले आहे. पोलिसांकडून सुरक्षेसंदर्भात अहवाल अद्याप मिळाला नसल्यामुळे या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. परिणामी, आतापर्यंत केलेला खर्च वाया जाणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या वाढली आहे. त्या व्यतिरिक्त मंत्रालयात येणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांची संख्याही दुप्पट झाली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूकवाढ झाली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानही मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. त्यामुळे मंत्रालयाच्या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते.
(हेही वाचा – ठाकरेंना धक्का; आणखी एक नगरसेवक शिवसेनेत दाखल)
त्यावर उपाय म्हणून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडथळ्यांची शर्यत पार न करता थेट विधानभवनात जाता यावे म्हणून मंत्रालय ते विधानभवनापर्यंत भुयारी मार्गाचा निर्णय घेण्यात आला. आधी फक्त मंत्रालय ते विधानभवन असा भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता मेट्रो स्थानक, विधानभवन, मंत्रालय व प्रशासकीय इमारत जोडणारा भुयारी मार्ग बांधला जात आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३चे बांधकाम करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हे काम देण्यात आले असून, त्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सध्या मंत्रालय ते स्टेट बँकेच्या इमारतीपर्यंत भुयारी मार्गाचे काम झाले असून मेट्रो स्थानक ते विधानभवनापर्यंतचे काम थांबविण्यात आले आहे. पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला तरच हे काम पुढे सुरू ठेवले जाणार आहे. मेट्रोला जोडणारा भुयारी मार्ग विधानभवनाच्या खालून जाणार असल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अहवाल राखून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी, या प्रकल्पासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, आतापर्यंत केलेला खर्च वाया जाणार का, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community