राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थाने ‘लक्षवेधी’ ठरले ते विक्रमी कामकाजामुळे. एकाच दिवशी ४२ लक्षवेधी पटलावर ठेवण्याचा विक्रम यंदा विधानसभेत नोंदवण्यात आला.
( हेही वाचा : अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?, वाबनकुळेंचा ठाकरेंना सवाल )
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत २ हजार ५५६, तर विधान परिषदेत ७९५ अशा मिळून ३ हजार ३५१ लक्षवेधी सूचना स्वीकृत करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत ४२ लक्षवेधी पटलावर ठेवण्यात आल्यामुळे नव्या विक्रमाची नोंद झाली.
२७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत विधानसभेत २ हजार ५५६ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ५३५ मान्य झाल्या, तर १४५ लक्षवेधीवर चर्चा झाली. विधान परिषदेत ७९५ लक्षवेधी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी मान्य झालेल्या २०६ लक्षवेधीपैकी ७३ लक्षवेधीवर चर्चा झाली.
परंतु शनिवारी शेवटच्या दिवशी विधान परिषदेत केवळ ८, तर विधानसभेत तब्बल ४२ लक्षवेधी कामकाजात दाखविण्यात आल्या. विशेष म्हणजे यामधील बहुतांश लक्षवेधी पटलावर मांडण्यात आल्या. शेवटचा दिवस असतानाही ४२ लक्षवेधी मांडल्यामुळे विधिमंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
कामकाजातील किती वेळ वाया गेला?
- संपूर्ण अर्थसंकल्पी अधिवेशनात विधानसभेत ७९८१ तारांकित प्रश्न प्राप्त झाले होते. त्यापैकी ५०६ प्रश्न स्वीकृत करून फक्त ५५ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली होती.
- विधान परिषदेत १८५६ प्रश्न प्राप्त झाले होते. त्यापैकी स्वीकृत झालेल्या ७०५ प्रश्नांपैकी फक्त ८४ प्रश्नांची उत्तरे विविध खात्यांच्या मंत्र्यांकडून मिळाली होती.
- सत्ताधारी आणि विरोधी बाकवरच्या आमदारांनी घातलेला गोंधळ आणि मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विधानसभेत ५ तास, तर विधान परिषदेत ४ तास १५ मिनिटांचा वेळ वाया गेला.