५ जून रोजी होणारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. मात्र राज ठाकरेंनी स्वतः ट्विट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित असल्याचे जाहीर केले. यासोबत त्यांनी रविवार २२ मे रोजी सकाळी दहा वाजता पुणे येथे होणाऱ्या दौऱ्याबद्दलही सांगितले. महाराष्ट्र सैनिकांनो, या… यावर सविस्तर बोलूया असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा स्थिगित झाल्यानंतर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. यावरच पुण्यातील सभेत सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
काय दिला मनसेने इशारा?
दरम्यान, मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट करत राज ठाकरेंची सभा स्थगित झाली म्हणजे काय झालं यांचा अर्थ विरोधकांना समजावून सांगितला आहे. ‘तूर्तास स्थगित’चा अर्थ ‘पुढे होईल’ असा आहे. जो नेता महाराष्ट्रहितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? मीडिया आणि विरोधकांनी ‘तूर्तास स्थगित’चा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत!, असे म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी हे ट्विट पोस्ट केले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! जाणून घ्या ‘राज’ की बात…)
— कीर्तिकुमार शिंदे (@KirtikumrShinde) May 20, 2022
पुण्यातील सभा होणारच…
दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा २२ मे रोजी होणार आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे राज हे मुंबईला रवाना झाले, असे सांगण्यात आले. ही सभा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता राज यांची सभा २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community