आयपीएस अधिकाऱ्यांचे लायझनींग एजंटशी सल्लामसलत! ‘ते’ ५ अधिकारी कोण? 

जेव्हा राज्याचे परिवहनमंत्री हे गृहखाते चालवायला बघतात, त्यावेळी साकीनाकासारख्या पाशवी बलात्काराच्या घटना घडत असतात, असा आरोप आमदार अमित साटम यांनी केला. 

121

माझ्याकडे पोलिस आयुक्त यांच्यासहीत पोलिस खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी हे एका लायझनींग एजन्टकडून अधिकृतपणे सल्लामसलत करतात याचे पुरावे आहेत. ज्यावेळी एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर पोलिस अधिकारी हे एखाद्या लायझनींग एजन्टशी सल्लामसलत करतात आणि तो त्यांना दिशानिर्देश देतो, असे आयपीएस अधिकारी जेव्हा पोलिस खात्यात असतात, त्यावेळी साकीनाकासारख्या पाशवी बलात्काराच्या घटना घडत असतात, असा गंभीर आरोप अंधेरी येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला. त्यामुळे आता पोलिस खात्यात ‘ते’ ५ उच्च पदस्थ अधिकारी कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांचा राजीनामा घ्या!

साकीनाका येथे घडलेल्या पाशवी बलात्कार आणि त्यानंतर त्या महिलेचा झालेला खून याचा आमदार अमित साटम यांनी निषेध केला आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा राज्याचे परिवहनमंत्री हे गृहखाते चालवायला बघतात, त्यावेळी अशा प्रकराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा मुंबईचे पोलिस हे ‘वाझे’गिरीत मग्न असतात किंवा अनेक ठिकाणी कोविडचे नियम शिथिल करण्यासाठी वेगवेगळे बार, हॉटेल्स, बँक्वेट हॉल आणि दुकानदार यांच्याकडून हफ्ता वसुली करण्यात मग्न असतात, त्यावेळी अशा प्रकारची घृणास्पद घटना शहरांमध्ये घडत असते. त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेतीची स्थिती एका वेगळ्या खालच्या स्तराला घसरलेली आपल्याला दिसून येते, यासाठी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, गृहखाते आणि राज्य सरकार जबाबदार आहे. जर राज्य सरकारला थोडी जरी लाज वाटत असेल, तर त्यांनी तात्काळ मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना घरी पाठवावे, अशी मागणी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करत आहेत, असे आमदार अमित साटम म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.