कामाख्या देवीचा नवस फेडणार! गुवाहाटी दौऱ्याबाबत शिंदे गटातील ‘या’ आमदाराने म्हटले…

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे समर्थक 50 आमदार, आणि 13 खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे कामाख्या देवीला नवस बोलले होते, तो नवस फेडण्यासाठी हा दौरा आखल्याची माहिती शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

(हेही वाचा – Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ‘ती’ भीती ठरली खरी)

दरम्यान, जून महिन्यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडल्या त्या काळात शिंदेंना आसामच्या ज्या लोकांनी मदत केली त्यांची देखील ते भेट घेणार आहेत. या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान, एकनाथ शिंदे गुवाहाटीचे मु्ख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलीस आयुक्तांना देखील भेटणार आहेत.

कसं असणार नियोजन

गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात शिंदेंकडून विशेष पूजेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिली. आमदारांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्यासाठी हा दौऱा तर नाही ना… असा सवालही शिंदेंच्या या दौऱ्यामुळे विचारला जात आहे.

पुढे सरनाईक असेही म्हणाले, इच्छा पूर्ण झाल्यामुळे देवीच्या दर्शनाला जाणार आहे. गुवाहाटीत २४ आणि २८ जून असे एकूण दोनवेळा एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदरांसह कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. राज्यात सत्ता आली तर सर्वांना घेऊन दर्शनाला येईन, असा नवस ते बोलले होते. त्यामुळे हा नवस फेडण्यासाठी शिंदे आता गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here