मुंबईत सुशोभिकरणाची योजना राबवण्याची घोषणा करून डिसेंबर २०२२पर्यंत ५० टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात ही कामे करण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारीचा महिना उलटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सुशोभिकरण योजनेच्या शहरातील कामांचा शुभारंभ गुरुवारी झाला असून उपनगरांमधील कामांचा शुभारंभ हा शनिवारी होणार असल्याने प्रत्यक्षात ही कामे पूर्ण होण्यास पुढील ३० ते ६० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा : प्रवाशांची होणार गैरसोय! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत मांडलेला प्राथमिक आराखडा पाहिल्यानंतर हा प्रकल्प तत्काळ राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत सुशोभिकरणाची योजना जाहीर करत डिसेंबर पूर्वी ही कामे करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानुसार मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी संपूर्ण महानगराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे तातडीने हाती घ्यावीत. नियोजित सर्व कामे गुणवत्तापूर्णरित्या, कलापूर्ण दृष्टीने आणि दीर्घकाळ टिकतील अशा तऱ्हेने मार्च २०२३ अखेर पूर्ण करावयाची असली तरी किमान ५० टक्के कामे ही डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी १६ सप्टेंबर रोजी प्रशासनाला दिले होते.
परंतु प्रत्यक्षात २४ विभाग कार्यालयांमध्ये निविदा प्रक्रिया राबवून या सुशोभिकरणाच्या कामांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शहरातील ५०० सुशोभिकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आला आहे. ८ डिसेंबर २०२२ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत या ५०० प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आल्याने ही कामे महिना ते दीड महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत ही कामे पूर्ण होणे शक्य नसल्याने महापालिका आयुक्तांना आपला शब्द खरा ठरवता येणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आता योजनेतील प्रकल्पांनाच यापुढे प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर २०२२पूर्वी ५० टक्के काम पूर्ण करण्याचे मिशन पार करण्याचे शिवधनुष्य आयुक्तांसाठी कठिण असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community