‘आपले सरकार पोर्टल’च्या ५०० सेवा आता व्हॉट्सअँपवर; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

58

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने “आपले सरकार” पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहेत. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर राहायचे. मात्र, व्हॉट्सॲपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉट्सअँप गव्हर्नन्स’ चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ फेब्रुवारीला सांगितले. (CM Devendra Fadnavis)

वांद्रे कुर्ला संकुल येथे आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२५’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात ‘मेटा’सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर एमएमआरडीए आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. ‘एमएमआरडीए’ने ‘एन.पी.सी.आय’ला बीकेसीमध्ये त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल-रोजगार-उद्योजकता- नाविन्यता विभाग आणि ‘टीम’सोबत नॉलेज ‘एआय हब’ संदर्भात सामंजस्य करार झाला. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

‘मुंबई टेक वीक’च्या (Mumbai Tech Week) उद्घाटन प्रसंगी ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

(हेही वाचा –चीनमध्ये AI Robot ने केला लोकांवर हल्ला; काय आहे संपूर्ण प्रकरण? )

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर (Wadhvan Port) हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हा पोर्ट सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठा असून, २० मीटर खोल बंदर असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात (Maritime trade) महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याच बरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीची उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी जलप्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

राज्यातील सायबर सुरक्षा (Cyber ​​security) उपाययोजना संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज जगभरातील गुन्हेगारी सायबर जगतात शिफ्ट होत आहे. भविष्यात ७०% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – BMC : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ महापालिका उभारणार नागरी बेघर निवार केंद्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या (Atal Setu) प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईतील दडपण कमी होईल, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.