भारतीय संस्कृती तब्बल ५ हजार वर्षांपासूनची जुनी आहे. त्याचे साक्षीपुरावे उपलब्ध होत असतात. नुकतेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. यात ५ हजार वर्षे जुना दागिने बनवणारा कारखाना आढळून आला आहे. आतापर्यंतच्या उत्खननात हा सर्वात मोठा शोध असल्याचे मानले जात आहे.
जुन्या पुरातत्व स्थळांपैकी राखी गढी एक गाव
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मागील 32 वर्षांपासून हरियाणातील राखी गढी येथे काम करत आहे. त्यांना दागिने बनवणारा ५ हजार वर्षांपूर्वीचा कारखाना आढळून आला. हा शोध आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सिंधू संस्कृतीशी संबंधित सर्वात जुन्या पुरातत्व स्थळांपैकी राखी गढी हे एक गाव आहे. या ठिकाणी उत्खननात घरांची रचना, एक स्वयंपाकघर आणि 5000 वर्षे जुना दागिने बनवण्याचा कारखाना सापडला, ज्यावरून असे दिसून येते की, हे ठिकाण एक अतिशय महत्त्वाचे व्यापार केंद्र असावे. हजारो वर्षांपासून लपवून ठेवलेले तांबे आणि सोन्याचे दागिनेही याठिकाणी सापडले.
(हेही वाचा राजद्रोह कायदा रद्द करण्यासाठी केंद्राचा पुढाकार)
राखी गढीचे लोक हस्तिनापूरचे पूर्वज
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने राखी गढीमध्ये गेल्या दोन महिन्यांत बरेच शोध लावले आहेत, जे विकासाचे प्रमाण दर्शवत असतात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. संजय मंजुळ म्हणाले, ‘आम्ही गेल्या 20 वर्षांत सिनौली, हस्तिनापूर आणि राखी गढीमध्ये बरेच काम केले आहे. राखी गढीचे लोक हस्तिनापूरच्या लोकांचे पूर्वज होते आणि त्यातूनच संस्कृतीला विकास आणि गती मिळाली आहे, असे म्हणता येईल.
Join Our WhatsApp Community