साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वाटले ५७ लाख रुपये… शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

तरीही, पॅनल पडले आणि पुढील १० वर्षांसाठी कारखाना बंद झाला.

निवडणुकांसाठी नेते पाण्यासारखा पैसा खर्च करतात हे सर्वश्रुत आहे. आता प्रत्यक्षात याबाबतचा खुलासा शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

साखर कारखाना निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो, असा धक्कादायक खुलासा सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात केला. निवडणूक जिंकण्यासाठी कशाप्रकारे आमिष दाखवून, एका मतासाठी ३ हजार रुपये मोजले, पार्ट्या केल्या याची जाहीर कबुली देत त्या काळात कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५७ लाख रुपये वाटले, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त करत त्यांनी शेतक-यांची माफी देखील मागितली.

(हेही वाचाः शिवसेना म्हणतेय, भाजपाचे १५-२० नगरसेवक संपर्कात)

निवडणुकीचं विदारक चित्र केलं स्पष्ट

१९९८ साली सांगोला सहकारी साखर कारखाना निवडणूक लढताना, कै. गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह सर्व तालुक्यातील आघाडीच्या नेत्यांनी पॅनल उभे केले. मात्र, शहाजी पाटील यांना यात स्थान न दिल्याने त्यांनी विरोधी पॅनल लढवले. १७०० सभासदांना निवडणुकीदरम्यान कोल्हापूरात ठेवले होते. देशमुख यांचे पॅनल प्रत्येक मतदाराला २ हजार देत असल्याने, आमदार शहाजी पाटील यांनी प्रत्येक मताला ३ हजार रुपये देत निवडणुकीसाठी ५७ लाख रुपये वाटले. तरीही, पॅनल पडले आणि पुढील १० वर्षांसाठी कारखाना बंद झाला. त्यामुळेच कारखान्याच्या दुरावस्थेला सर्व नेते जबाबदार असल्याचे सांगत साखर कारखाना निवडणुकांचं वास्तव व विदारक चित्र आमदार शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः बाळासाहेबांमुळेच मोदींचे अस्तित्व आहे नाहीतर… शिवसेना आमदाराचे मोठे विधान)

सांगोला साखर कारखाना पुन्हा सुरू

राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती अभिजित पाटील यांच्या धाराशिव कारखान्याला २५ वर्षांच्या भाडेपट्टी करारावर सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास दिला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्याचा पुन:श्च हरीओम करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here